प्रत्येक पदार्थ तयार करण्याची एक ठरलेली अशी कृती किंवा पद्धत असते. अर्थात त्यातही काही जणांची खासियत असते. अशी खासियत दिसली की लोक आपोआप थांबतात. पदार्थाचा चवीनं आस्वाद घेतात. माठातली लोणची अशी पाटी

बघायला मिळाल्यावर कोण थांबणार नाही.. पारंपरिक चव जपण्याचा हा एक आगळा प्रयोग आहे आणि पारंपरिक चव जपली जात असल्यामुळे या बचत गटाच्या उत्पादनांना मागणीही चांगली आहे.

परवाचा प्रसंग.. संध्याकाळची वेळ.. बाजीराव रस्त्यावरच्या त्या चौकात भरपूर गर्दी झाली होती.. लोक थांबून थांबून त्या गाडीकडे पाहात होते.. गाडीत कोणकोणते पदार्थ विक्रीसाठी आहेत, याची माहिती देणारी कॅसेट एकीकडे वाजत होती.. पाहताच कोणीही थबकावं अशीच एकूण परिस्थिती.. कारण जे कानावर पडत होतं आणि जे समोर दिसत होतं त्यात निश्चितच वेगळेपण होतं..

संतकृपा महिला गृहउद्योगाची ती गाडी सर्वाचंच लक्ष वेधत होती. गाडीची सजावट आकर्षक होती. पदार्थाची मांडणीही नजरेत भरण्यासारखी. समोर दिसणारे पदार्थ पाहताच कोणीही सहज दोन-चार पदार्थ खरेदी करत होते. मुख्य जाहिरात सुरू होती ती माठातल्या देशी गावरान लोणच्यांची आणि उखळावरच्या चटण्या व मसाल्यांची. गाडीवरचे तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ पाहताना अनेकांना काय काय घ्यायचं असं होऊन जात होतं.

या उद्योगाची माहिती घेतल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थाची आणखीही खूप वैशिष्टय़ं समजली. विशाल सोळसे यादव हे सातारा जिल्ह्य़ात कोरेगाव तालुक्यात असलेल्या सोळशी या छोटय़ाशा गावातले. ते आणि त्यांचे बंधू अमोल, विशाल व अमोल यांच्या पत्नी, आई विजया, वडील ज्ञानेश्वर असं हे संपूर्ण कुटुंब या व्यवसायात आहे. शिवाय या व्यवसायाशी जोडलेले दहा-बारा बचत गट आणि त्यांच्यात सहभागी होणाऱ्या शेकडो महिला असा मोठा पसारा आहे. विजया सोळसे यांनी पंधरा वर्षांपूर्वी अगदी छोटय़ा म्हणजे घरगुती स्वरुपात चटण्या, मसाले, लोणची वगैरे तयार करून विकण्याचा व्यवसाय त्यांच्या गावात सुरू केला. विशाल आणि अमोल हे दोघे ते पदार्थ पुण्यात घरोघरी जाऊन विकायचे. पहिल्या वर्षीच लक्षात आलं की हे पदार्थ लोकांना पसंत पडत आहेत. जवळजवळ दहा-अकरा वर्ष या दोघांनी या पद्धतीने हे पदार्थ घरोघरी विकले आणि त्यातूनच एक मोठा व्यवसाय हळूहळू उभा राहिला. आई जे काही पदार्थ तयार करायची ते सगळे घरगुती आणि ग्रामीण ढंगाचे, ग्रामीण थाटाचे असायचे. त्यामुळे ती चव लोकांना खूप आवडायची. त्यातूनच आम्ही हे पक्कं ठरवलं की पदार्थ तयार करण्याची ती पद्धत अजिबात बिघडू द्यायची नाही, असं विशाल सोळसे आवर्जून सांगतात.

लोणची असोत, शेवया असोत, पापड असोत वा चटण्या, मसाले.. कोणतंही उत्पादन पारंपरिक पद्धतीनंच बनवायचं, त्यात कुठेही यंत्राचा वापर करायचा नाही, हा या उद्योगाचा परिपाठ आणि उत्पादनांना कितीही मागणी असली तरी यंत्राचा वापर न करता सर्व प्रकार तयार केले जातात, हे या पदार्थाचं वैशिष्टय़ं. म्हणजे कैेरीच्या लोणच्याची कितीही मागणी असली तरी कैरी चिरण्यासाठीसुद्धा इथे यंत्राचा वापर केला जात नाही. शिवाय, लोणचं तयार करण्याची जी पारंपरिक पद्धत आहे, म्हणजे लोणचं तयार करून ते मुरवत ठेवायचं हीच पद्धत कायम आहे. या पद्धतीमुळे लोणच्यातली फोड मऊ पडत नाही. लोणचं तयार करून बरण्यांमध्ये तीन महिने मुरवलं जातं. त्यामुळे जी चव येते ती खरी पारंपरिक चव. शेवयासुद्धा बचत गटातील महिला पाटय़ावरच तयार करतात. त्यासाठीही यंत्राचा वापर केला जात नाही. याच पद्धतीनं म्हणजे यंत्राचा वापर न करता मसाले, चटण्याही तयार केल्या जातात. सुमारे सव्वाशे प्रकारची उत्पादनं संतकृपा उद्योगात तयार होतात आणि तीही पारंपरिक चव व तयार करण्याची पारंपरिक पद्धत जपत.

गावरान आंबा, गावरान सुका आंबा, खानदेशी आंबा, गोड लिंबू, गाजर, मिरची अशी जवळपास तीस प्रकारची लोणची, गव्हाच्या, रव्याच्या कुरडया, पापडय़ा, सांडगे, बावीस प्रकारचे हाताने लाटलेले पापड, पाटय़ावर वाटलेला ठेचा, उखळावर कुटलेल्या सहा प्रकारच्या चटण्या आणि पंधरा-वीस प्रकारचे मसाले.. अशी या उद्योगात तयार होणाऱ्या पदार्थाची यादी खूप लांबत जाईल. ही यादी मोठी आहे आणि सर्वच पदार्थ गेली अनेक वर्ष ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले आहेत.

हे पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या वर्षांपासून दोन फिरत्या गाडय़ा तयार करण्यात आल्या आहेत. या गाडय़ा रोज संध्याकाळी शहरात ठिकठिकाणी जातात आणि त्या माध्यमातूनही उत्पादनांची विक्री केली जाते.

संतकृपा महिला बचत गट संचालित

संतकृपा महिला गृहउद्योग संपर्क : ८१४९१३८१९०

Story img Loader