पुणे : ‘बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व्यापक कटाचा भाग आहे. देशमुख यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई व्हायला हवी,’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी परिसंवादात केली. खंडणी, वाळू तस्करी, बीडमधील ओैष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेचे कंत्राट, भ्रष्टाचार, सरकारी व्यवस्थेशी संगनमत, संघटित गुन्हेगारीकडे अशा विविध विषयांवर वक्त्यांनी भाष्य करुन देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कारवाईची मागणी केली.
‘महाराष्ट्र माझा’ या संस्थेकडून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या वेळी दमानिया बोलत हाेत्या. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, ॲड. असीम सरोदे, निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, कन्या वैभवी देशमुख, मुलगा विराज देशमुख, तसेच संयोजक प्रमोद प्रभुलकर या वेळी उपस्थित होते.
‘राखेच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्या होत्या. बीड पोलीस, तसेच सरकारी यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केले. वाल्मिक कराड याच्याविरुद्ध १६ गुन्हे दाखल झाले होते. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही. खंडणी प्रकरणात बैठका घेण्यात आल्या. देशमुख यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. या व्यापक कटाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यायला हवा,’ असे दमानिया यांनी सांगितले.
‘देशमुख यांच्या हत्येनंतर चित्रफीत कोणी प्रसारित केली, याचा शोध घ्यायला हवा. देशमुख यांची हत्या म्हणजे शासन, तसेच प्रशासनाचे अपयश आहे. संवेदनशील खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाते. नियुक्तीसाठी वशिलेबाजी केली जाते,’ असा आरोप ॲड. सरोदे यांनी केला.
पोलीस व्यवस्था कालबाह्य झाली आहे. ही व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. जातीय दंगलीमागचे वास्तव जाणून घ्यायला हवे. धर्म आणि जातीवरून समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे खोपडे यांनी स्पष्ट केले.
‘संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सर्वांनी आम्हाला मदत केली. त्यांची हत्या करणारे दहशतवादीच आहेत. त्यांना कठोर शिक्षा व्हायल हवी,’ असे देशमुख यांनी नमूद केले.