एसटी चालक संतोष माने याने बेफाम बस चालवून तीन वर्षांपूर्वी पुण्यात घातलेल्या धुमाकुळाच्या कटुस्मृती आजही पुणेकरांच्या मनात आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेत नऊ निराधारांचे बळी गेले तसेच पंचवीसजण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर एसटीला आजवर एक कोटी ८६ लाखांचा भरुदड सोसावा लागला आहे. महामंडळाने तातडीचा निधी म्हणून ७० लाख रुपये खर्च केले, तर आतापर्यंत अपघातांच्या अकरा दाव्यात न्यायालयाने ९८ लाख १३ हजार ८०० रुपये देण्याचे आदेश दिला आहे.
माने याने २५ जानेवारी २०१२ रोजी स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारातून बस पळवली. त्याने बेदरकारपणे बस चालवून निरपराधांचे बळी घेतले. या घटनेला सोमवारी तीन वर्ष पूर्ण होत आहे. दुर्घटनेच्या दिवशी चाळीस ते पन्नास गाडय़ांचे नुकसान झाले होते. त्यावेळी एसटी महामंडळाने तातडीचा निधी म्हणून ७० लाख रुपये खर्च केले होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये देण्यात आले होते तसेच जखमींच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली होती. उर्वरित रक्कम उपचारासाठी खर्च करण्यात आली होती.
या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या विरोधात मोटार अपघात न्यायप्राधिकरणात अकरा दावे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सात दावे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसदारांनी दाखल केले होते तसेच जखमी झालेले आणि ज्यांच्या वाहनांचे नुकसान झाले असे प्रत्येकी चार दावे दाखल करण्यात आले होते. एसटी महामंडळाचे सल्लागार अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांनी या संदर्भात अर्ज करून सर्व दावे सत्र न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांच्या न्यायालयात वर्ग केले. काही दाव्यांमध्ये वाजवीपेक्षा जास्त भरपाई मागण्यात आली होती. हे अ‍ॅड. गुंजाळ यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले.
अकरा दाव्यात महामंडळाला दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून आठ टक्के व्याजाने एकू ण ९८ लाख १३ हजार ८०० रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या निधीला मंजुरी देण्यात आली असून एसटी  प्रशासन लवकरच ही रक्कम न्यायालयात भरणार आहे.

Story img Loader