येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील चार डॉक्टरांच्या पथकाने संतोष मानेची वैद्यकीय तपासणी करून तो जबाब देण्यास मानसिकदृष्टय़ा सक्षम असल्याचा अहवाल सोमवारी न्यायालयास दिला. त्यानुसार मानेचा जबाब घेण्याच्या कामाला सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी सुरुवात केली.
संतोष मानेला सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याच्या विरुद्ध माने याने उच्च न्यायालयात अपील केले होते. या अपिलाच्या वेळी माने याला शिक्षेवर म्हणणे मांडण्यास दिले नसल्याचा बचाव आरोपीचे वकील अॅड. धनंजय माने यांनी केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने मानेची फाशीची शिक्षा रद्द करून शिक्षेवर मानेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी खटला परत सत्र न्यायालयाकडे पाठविला होता. सत्र न्यायालयात खटला सुरू होताना संतोष मानेचे वकील अॅड. धनंजय माने यांनी मानेचा जबाब घेण्याअगोदर त्याची वैद्यकीय तपासणी करावी, असा अर्ज न्यायालयाकडे केला होता. या मागणीला मुख्य सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी विरोध केला.
न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मानेची येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून २८ ऑक्टोबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. आर. भैलुमे, डॉ. एम. आर. बहाले, डॉ. पी. एस. घोरपडे आणि डॉ. एच. यू. पेंडसे या चार तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मानेची वैद्यकीय तपासणी केली. माने हा जबाब देण्यास मानसिकदृष्टय़ा सक्षम असल्याचा अहवाल न्यायालयात दिला. माने हा मानसिक रुग्ण असल्याची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे. मानेने झोप व्यवस्थित झोप येत नाही, तसेच चिडचिडेपणा जाणवत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे येरवडा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला दोन आठवडय़ांच्या गोळ्या दिल्या आहेत. माने हा जबाब देण्यास सक्षम असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर न्यायालयाने सोमवारी दुपारी त्याचा जबाब नोंदविण्यास सुरुवात केली. त्यानुसार मानेला न्यायालयाने अनेक प्रश्न विचारले पण, त्याला मानेने ‘नकारार्थी’ असेच उत्तर दिले. या खटल्याची पुढील सुनावणी सात नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा