स्वारगेट स्थानकातून एसटी बस चोरून ती बेदरकारपणे चालवत नऊ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेला सत्र न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर म्हणणे ऐकल्यानंतर बुधवारी फाशीची शिक्षा कायम ठेवली. ‘न्यायालयाने तुम्हाला बाजू मांडण्यास संधी दिली. पण, केलेल्या अघोरी कृत्याचा पश्चात्ताप झालेला दिसत नाही. फाशीपेक्षा कमी शिक्षा दिली तर कायद्याची पायमल्ली होईल,’ असे नमूद करत जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.के. शेवाळे यांनी मानेला फाशीची शिक्षा सुनावली.
एसटीचालक संतोष माने याने २५ जानेवारी २०१२ रोजी बेदरकारपणे बस चालवत नऊ जणांचे बळी घेतले. याप्रकरणी सत्र न्यायालयाने मानेला ८ एप्रिल २०१३ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेच्या विरुद्ध माने याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात बचाव करताना आरोपींच्या वकिलांनी संतोष मानेला शिक्षा सुनावण्याच्या अगोदर शिक्षेवर म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही, असा बचाव केला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने मानेची फाशीची शिक्षा रद्द करून सत्र न्यायालयास मानेच्या शिक्षेवर म्हणणे नोंदविण्यास सांगितले होते.
उच्च न्यायालयातून सत्र न्यायालयात खटला परत पाठविल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी मानेच्या शिक्षेवर म्हणणे मांडण्याच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी संतोष माने हा शिक्षेवर म्हणणे मांडण्यास सक्षम नसल्याने जबाब घेण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करावी, असा अर्ज अॅड. धनंजय माने यांनी न्यायालयाकडे केला होता. त्यानुसार मानेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. तो मानसिकदृष्टय़ा सक्षम असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. या खटल्याचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर बुधवारी मानेला न्यायालयाने शिक्षा सुनावली.
न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे की, माने हा मानसिकदृष्टय़ा सक्षम आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा बचाव हा खोडसाळपणाचा असून न्यायालयीन प्रक्रियेला विलंब लावणार आहे. रात्रपाळीचे काम बदलून दिले नाही म्हणून माने याने गुन्ह्य़ाचे कृत्य केले. निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची काय वाताहत होते याचे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निवाडे आहेत. या गुन्हात फाशीच्या शिक्षेपेक्षा कमी दिली तर कायद्याची पायमल्ली होईल. तुला न्यायालयाने अनेक वेळा बाजू मांडण्याची संधी दिली. काही साक्षीदार पुरावे सादर करायचे आहेत का, याबाबत विचारले होते. तू केलेल्या आघोरी कृत्यूचा पश्चाताप झालेला दिसत नाही. त्यामुळे तुला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही.
संतोष मानेची फाशीची शिक्षा फेरसुनावणीनंतरही कायम
स्वारगेट स्थानकातून एसटी बस चोरून ती बेदरकारपणे चालवत नऊ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेला सत्र न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर म्हणणे ऐकल्यानंतर बुधवारी फाशीची शिक्षा कायम ठेवली. ‘न्यायालयाने तुम्हाला बाजू मांडण्यास संधी दिली.
First published on: 12-12-2013 at 02:58 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh mane hang continue after rehearing