सीबीएसई दहावीमध्ये संयोगिता सरीनचे यश

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेच्या आधी गुडघा निखळूनही द ऑरबिस स्कूलच्या संयोगिता सरीन या विद्यार्थिनीने यश मिळवले. संयोगिताने ९५ टक्के गुण मिळवत शाळेत तिसरा क्रमांक मिळवण्याची कामगिरी केली.

सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात पुण्यासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली. पुण्यातील द ऑरबिस स्कूलमध्ये शिकणाऱ्या संयोगिता सरीनला मात्र अचानक आलेल्या आव्हानाला सामोरे जात परीक्षा द्यावी लागली. परीक्षेआधी जवळपास महिनाभर आधी तिचा गुडघा निखळला. परीक्षा तोंडावर आलेली असताना तिला महिनाभर झोपून राहावे लागले. मात्र, तरीही खचून न जाता तिने सातत्यपूर्ण पद्धतीने अभ्यास करून ९५ टक्के गुण प्राप्त केले.

‘माझे गुडघे जरा कमजोर आहेत. हा आनुवंशिक दोष आहे. आमच्या शाळेत समारोप कार्यक्रमात नाच करताना पडले. त्यावेळी माझा उजवा गुडघा निखळला. पुढे काही दिवस मला अक्षरश झोपून राहावे लागले. या प्रकाराने मला धक्का बसला होता. मात्र, त्यातून सावरत अभ्यास सुरूच ठेवला.

वर्षभर मी नियमित अभ्यास करत होते. शाळेसह दररोज किमान तीन तास अभ्यास करायचे. त्याचा मला फायदा झाला,’ अशी भावना संयोगिताने व्यक्त केली.