पुणे : क्रीडा प्रशिक्षक आणि मल्लखांबाचे प्रचारक असलेल्या वडिलांच्या मार्गदर्शनातून एक-दोन नव्हे तर चक्क नऊ मुलांनी शिस्त अंगी बाणवत क्रीडा क्षेत्रात नावलौकिक कमावला. स्वातंत्रपूर्व काळात लोकप्रिय क्रीडाप्रकार असलेल्या वेताचा आणि दोरीवरचा मल्लखांब याचे प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या सात करमरकर भगिनींची वाटचाल त्यांच्याशी झालेल्या दिलखुलास संवादातून उलगडली.   आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीवर आयुष्याला आकार देत असताना त्यांनी लहानपणापासून लावलेली व्यायामाची गोडी, समाजकार्याची निर्माण केलेली आवड यामुळेच आयुष्यात यशस्वी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

हिंदू महिला सभेतर्फे ‘आमचे नवरंगी कर्तृत्व’ या कार्यक्रमामध्ये या सर्व करमरकर भगिनींच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आशा करमरकर (सध्याच्या मीना आपटे), सरला करमरकर (सुप्रिया बर्वे), शीला करमरकर (सुनीला देवधर), शिरीष करमरकर (वैशाली भट), रेखा करमरकर (रुक्मिणी साठे), कांचन करमरकर (शिल्पा पटवर्धन), वर्षा करमरकर (सोनिया पटवर्धन) या भगिनींशी लेखिका माधुरी ताम्हणे यांनी संवाद साधला. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले आणि उपाध्यक्षा मधुरा जोगळेकर या वेळी उपस्थित होत्या.

आमचे वडील आप्पा म्हणजे मिरजेतील प्रसिद्ध वैद्य म. द. करमरकर यांनी आमच्यामध्ये लहानपणापासूनच खेळाची गोडी निर्माण केली.  त्यामुळे आयुष्याला आकार येत गेला. त्यांच्या शिस्तीपुढे आमचे काहीच चालायचे नाही. पहाटे पाच वाजता आमचा दिवस सुरु व्हायचा. खेळाडू म्हणून घडत असताना आई प्रभावती हीदेखील दररोज न चुकता पळायला येत असे. इतकेच नाही तर ती कबड्डी, खो-खो खेळायची. त्यामुळे आमच्यामध्ये ते गुण रुजत गेले. व्यायाम करणे हे इतके अंगवळणी पडले होते की त्यामध्ये खाडा पडला  तर कंटाळा यायचा, अशी आठवण आशा करमरकर यांनी सांगितली. आई आणि वडील यांचे सहजीवन हे डोळा आणि काजळासारखे होते. आम्हा नऊ मुलींना त्यांनी मुलासारखेच वागवल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.

एकेकाळी खेळाडू म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या भगिनी व्यवसायात कार्यरत आहेत. मीना आपटे या ‘आपटे फूडस’च्या संस्थापिका असून सुप्रिया बर्वे हर्बेल उत्पादनामध्ये काम करतात. वैशाली भट या हॉटेल व्यवसायात असून शिल्पा पटवर्धन या रत्नागिरीमधील माजी नगरसेविका आहेत. सोनिया पटवर्धन हेल्थ क्लबच्या संचालिका आहेत. वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

आप्पांनी या खेळाचा प्रचार आणि प्रसार करताना आम्हाला चांगले माणूस म्हणून घडवण्याचे काम केले. त्यांच्यामुळे आम्ही चांगले खेळाडू म्हणून पुढे आलो. समाजाचे ऋण फेडण्यासाठी लोकांना कायम उपयोगी पडण्याचा गुण त्यांनीच आम्हाला दिला. त्यामुळेच त्यांचा समाजकार्याचा वारसा आम्ही भगिनी पुढे नेत आहेत. न बोलता काम करा, काम करताना अडचण आली तर त्यावर मात करून पुढे चला, चिकाटी आणि कष्ट याच्या जोरावर यश मिळवा. हे गुण आप्पांनी आपल्यामध्ये रुजवल्यामुळे आम्ही यशस्वी झालो. – करमरकर भगिनी