पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवपदी सनदी अधिकारी डाॅ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या सारथी हेल्पलाइनला ‘अच्छे दिन’ आले आहेत. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत सारथी हेल्पलाइनच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास विभाग प्रमुखांवर कारवाईचा इशारा दिला आहे. सारथीवर तक्रारींचा ‘पाऊस’ पडत असून ११ महिन्यांत ८७ हजार ६६५ तक्रारी हेल्पलाइनवर आल्या आहेत.
शहरातील नागरिकांना तक्रारी करता याव्यात, त्यांच्या तक्रारीचे निराकरण व्हावे, या उद्देशाने तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी २०१३ मध्ये सारथी हेल्पलाइन सुरू केली. या हेल्पलाइनवर तक्रारी केल्यानंतर नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण होत असे. सारथीचे देशपातळीवर काैतुकही झाले. मात्र, डॉ. परदेशी यांच्या मुदतपूर्व बदलीनंतर आलेल्या प्रत्येक आयुक्तांचे सारथीकडे काहीसे दुर्लक्ष झाले. सारथीवरील अनेक तक्रारी न सोडविताच बंद केल्या जात असल्याचे वारंवार समाेर आले.
हेही वाचा – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, धर्म सोडून वागल्यास सृष्टी…
सारथीवर मागील ११ महिन्यांत ८७ हजार ६६५ तक्रारी आल्या. त्यांपैकी ८५ हजार ७६ तक्रारींचा निपटारा झाला असून २ हजार ५८९ तक्रारी प्रलंबित आहेत. वृक्षसंवर्धन, अतिक्रमण, जलनिस्सारण, आराेग्य, पशुवैद्यकीय आणि पाणीपुरवठा या सहा विभागांच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यानंतर शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे, चेंबर तुटल्याच्या, झाडांच्या फांद्या ताेडण्याच्या तक्रारी येतात.
सारथी हेल्पलाइन सुरू करणारे डाॅ. परदेशी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. परदेशी यांची नियुक्ती हाेताच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सारथी हेल्पलाइनबाबत विभागप्रमुखांची बैठक घेतली. सारथीवरील तक्रारींकडे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले. यापुढील काळात सारथीवरील तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नगरसेवक नसल्याने सारथीवर तक्रारींचा पाऊस
महापालिकेतील नगरसेवकांचा १३ मार्च २०२२ राेजी पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील प्रश्न मांडण्यासाठी सारथी हेल्पलाइन अधिक प्रभावी ठरत आहे. त्यामुळेच या हेल्पलाइनवर तक्रारींचा माेठा ओघ सुरू आहे.
तक्रारींची पुन्हा दखल घेणार
गेल्या सहा महिन्यांमध्ये नागरिकांनी सारथीवर तक्रारी नोंदविल्या आहेत. ज्या तक्रारी कोणतीही कार्यवाही न करता बंद केल्या आहेत, ते नागरिक त्यांची तक्रार पुन्हा सारथीवरून उघडू शकतात. त्यानंतर संबंधित तक्रारीवर योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी ती विभागप्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे.
हेही वाचा – नृत्य प्रशिक्षकाकडून बालिकेशी अश्लील कृत्य
सारथीवर आलेल्या प्रत्येक तक्रारीचे वेळेवर, प्रभावीपणे निराकरण करणे अपेक्षित आहे. निराकरण केल्याशिवाय कोणतीही तक्रार बंद केल्याचे आढळल्यास यापुढे विभागप्रमुखांवर कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.