पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘सारथी’ हेल्पलाईनमधील गोपनीयता काढून टाकण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. नागरिकांनी केलेल्या तक्रारी संबंधित प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांकडे पाठवण्यात याव्यात, असा प्रस्ताव पालिकेच्या विधी समितीने मंजूर केला आहे. तो मुख्य सभेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असून, ते रोखण्यासाठी सेवाभावी संघटनांनी महापौर मोहिनी लांडे यांच्याकडे दाद मागितली आहे.
परदेशी यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी ‘सारथी’ हेल्पलाईन सुरू केली. त्यामुळे नागरिकांना अतिशय सोप्या पद्धतीने त्यांच्या तक्रारी पालिकेकडे नोंदवता येत होत्या. मात्र, यात हस्तक्षेप करून आमच्या वॉर्डातील तक्रारी आमच्याकडे पाठवण्यात याव्यात, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी परदेशी यांच्याकडे केली होती. मात्र, तक्रार करणाऱ्या नागरिकांची ओळख जाहीर होऊ नये म्हणून परदेशी यांनी ही मागणी मान्य केली नव्हती.
मात्र, आता परदेशी यांची बदली झाल्यानंतर नगरसेवकांनी उचल खाल्ली आहे. नागरिकांच्या तक्रारी संबंधित प्रभागातील नगरसेवकांकडे पाठवण्यात याव्यात, असा प्रस्ताव पिंपरी महापालिकेच्या विधी समितीने मंजूर केला आहे. हा प्रस्ताव गेल्या काही दिवसांत मंजूर केल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. आता हा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. मात्र, त्याला मंजुरी देऊ नये, असे आवाहन करणारे पत्र संघटनांनी महापौर मोहिनी लांडे यांना पाठवले आहे.
नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद नगरसेवकांना कळविणे हे कायद्याने बंधनकारक नाही. तसे झाले तर तक्रार करणाऱ्या नागरिकांना नगरसेवक धमकावू शकतात. त्यामुळे नागरिक मोकळेपणाने त्यांच्या तक्रारी करण्यास धजावणार नाहीत. त्याचबरोबर सारथी उपक्रमाच्या विश्वासार्हतेलासुद्धा तडा जाईल, असा धोका त्यांनी व्यक्त केला आहे.
 
महापौरांकडे दाद मागणाऱ्या संघटना
याबाबत धनंजय शेडबळे यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात सजग नागरिक मंच (विवेक वेलणकर), पीएमपी प्रवासी मंच (जुगल राठी), नागरी चेतना मंच (नि. कर्नल जठार), नॅशनल एससीवाय फॉर क्लिन सिटी, मंगेश तेंडुलकर, ग्राहक पेठ (सूर्यकांत पाठक), जीविधा (राजीव पंडित), देवराई (राजीव भावसार), सुराज्य संघटना समिती (विजय कुंभार), पवनामाई मैत्री अभियान (व्यंकटेश भटाने), अमोल देशपांडे, इंडिया अगेन्स्ट करप्शन (यतीश देवडिगा), पेडेस्ट्रियन फर्स्ट (आय.एम. मर्चन्ट), परिवर्तन (अनिकेत मुंदडा) यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा