मुळातच भ्रष्ट असलेल्या राज्यसरकारची आदर्श प्रकरणात पुरती नाचक्की झाली असून सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे डावे-उजवे हात समजले जाणारे मंत्रीही आदर्शच्या घोटाळ्यात गुंतलेले आहेत, अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्तया डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरीत बोलताना केली. आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असली तरी हिंदुत्ववादी पक्ष राष्ट्रवादीसोबत कदापि जाणार नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली.
पिंपरीचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशींनी सुरू केलेल्या ‘सारथी’ उपक्रमाची माहिती घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे पालिकेत आल्या होत्या, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘सारथी’ वरून आयुक्तांचे कौतुक करतानाच शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत ‘सारथी’ सुरू करण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी नमूद केले. सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे, उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, शहरप्रमुख योगेश बाबर, राहुल कलाटे, नगरसेविका सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, संपत पवार, नीलेश बारणे, संगीता भोंडवे आदी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,की मुख्यमंत्र्यांनी पिंपरीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा कायदा महिन्याभरात करू, अशी घोषणा केली आहे. तोपर्यंत पाडापाडी कारवाई करू नये. याबाबतचा निर्णय घेण्यास सरकार विलंब करत असले व त्यातून श्रेय घेण्याचा प्रयत्न असला तरी हा विषय श्रेयाच्या पलीकडे गेला आहे. आदर्श प्रकरणात सुनील तटकरे, राजेश टोपे यांची नावे असून बैठका घेतल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. २२ जणांचे बेनामी व्यवहार असून त्यात गुंतलेले १२ अधिकारी पदावर कायम आहेत. सरकार भ्रष्ट असून केंद्राचा दबाव त्यांच्यावर आहे. मात्र, कोंबडे कितीही झाकले तरी फरक पडणार नाही. अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर ‘आप’ चे काय परिणाम होतील, असे विचारले असता त्यांचे धोरण काय आहे, ते कशापध्दतीने काम करतात, ते पाहिल्यानंतर याबाबत भाष्य करणे उचित राहील. दिल्लीतील काँग्रेस सरकारवर असलेला राग जनतेने मतपेटीत व्यक्त केला, त्याचा फायदा ‘आप’ ला झाला, अशी टिप्पणी त्यांनी केली.
नामोल्लेख टाळणे हा भाजपचा प्रश्न
मुंबईतील भाजपच्या महागर्जना सभेत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही, असा प्रश्न विचारला असता भाजप हा स्वतंत्र पक्ष असून त्यांनी काय बोलावे, हा त्यांचा प्रश्न आहे. ती सभा राष्ट्रीय स्तरावरील होती, या मुद्दय़ावरून वेगवेगळे तर्क लावणे चुकीचे ठरेल, अशी टिप्पणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा