लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : छत्रपती शाहू संशोधन, प्रशिक्षण आणि मान विकास संस्थेला (सारथी) कोल्हापूर येथे १.८५ हेक्टर जागा मिळाली आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठीचे आरक्षण अधिसूचनेद्वारे वगळून ती जागा सारथी संस्थेला देण्यात आली असून, या जागेवर आता छत्रपती शिवाजी महाराज संकुल उभारले जाणार आहे.
कोल्हापूर येथील राजाराम महाराज विद्यालयातील जागा सारथी संस्थेला दिली. मात्र या जागेवर उच्च न्यायालयाचे आरक्षण असल्याने संस्थेला बांधकाम करता येत नव्हते. मात्र उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी अन्यत्र जागा आरक्षित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाला कळवले. त्यानंतर मंत्रिमंडळाने २ मार्च २०२२ रोजीच्या बैठकीत आरक्षण वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नगरविकास विभागाने अधिसूचना प्रसिद्ध करून उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठीचे आरक्षण वगळण्यात आल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
आणखी वाचा-पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठीच्या सीयूईटी- पीजी परीक्षेची नोंदणी सुरू… जाणून घ्या सविस्तर…
आरक्षण वगळून आता ही संपूर्ण जागा सार्वजनिक, निमसार्वजिक प्रयोजनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सारथी संस्थेला छत्रपती शिवाजी महाराज संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संकुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणार आहे. सारथी संस्थेला उपलब्ध झालेल्या जागेमध्ये आता मुलांचे, मुलींचे वसतिगृह उभारले जाणार आहे, तसेच शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत.