पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) ‘सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील १ हजार ५०० तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार असून, प्रशिक्षणार्थ्यांना एका प्रशिक्षण महिन्यासाठी १० हजार रुपये विद्यावेतनही देण्यात येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी ही माहिती दिली. प्रशिक्षित वाहन चालकांना देशात आणि परदेशात मागणी वाढत होत आहे. त्यानुसार संस्थेने १५०० व्यक्तींना दरवर्षी हलकी मोटार वाहने (लाईट मोटर व्हेईकल) व जड मालवाहू वाहने (हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल) चालवण्याचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सारथीचे अध्यक्ष तथा निवृत्त मुख्य सचिव अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाने १७ डिसेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेला मान्यता दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी, १९ फेब्रुवारी २०२५पासून वाहन चालक प्रशिक्षण सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत.

हेही वाचा…टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, शेवगा, पावट्याच्या दरात घट

योजनेअंतर्गत सहभागी तरुण-तरुणींना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत असलेल्या आयडीटीआर पुणे या संस्थेमार्फत एका महिन्याचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे. दररोज आठ तासांचे हे प्रशिक्षण राहील. त्यात वाहनांचे भाग, त्यांची देखभाल, दुरुस्ती, वाहन चालवण्याच्या भारतातील, परदेशातील नियमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच दररोज क्षेत्रीय स्तरावर सराव आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण भागात, तसेच परदेशात तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarathi will conduct sardar suryaji kakade sarathi vehicle driver skill development training programme pune print news ccp 14 sud 02