ज्येष्ठ कवयित्री, कथालेखिका आणि बालसाहित्यकार सरिता पदकी (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने अमेरिकेमध्ये निधन झाले.  
सरिता पदकी या पूर्वाश्रमीच्या शांता कुलकर्णी. संस्कृत विषयामध्ये एम.ए. पदवी संपादन केल्यावर त्यांनी काही काळ डेक्कन कॉलेज येथे कोश विभागात काम केले. फग्र्युसन महाविद्यालयामध्ये त्यांनी संस्कृत विषयाचे अध्यापन केले. बालवाङ्मय, कथा, कविता, नाटक, अनुवाद असे लेखन करणाऱ्या पदकी यांनी मुलांसाठी कथा, कादंबऱ्या आणि कविता लिहिल्या. ‘गुटर्र गूं गुटर्र गूं’ आणि ‘नाच पोरी नाच’ हे त्यांच्या बालकवितांचे संग्रह आणि ‘जंमत टंपूटिल्लूची’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. १९६० नंतरच्या कालखंडात सरिता पदकी यांचे ‘बारा रामाचं देऊळ’, ‘घुम्मट’ हे दोन कथासंग्रह आणि ‘चैत्रपुष्प’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. ‘बाधा’, ‘खून पाहावा करून’ आणि ‘सीता’ ही त्यांची तीन नाटके वैशिष्टय़पूर्ण मानली जातात. करोलिना मारिया डी जीझस यांच्या ‘चाइल्ड ऑफ द डार्क’ या ब्राझीलमधील झोपडपट्टीत राहाणाऱ्या निग्रो स्त्रीच्या आत्मनिवेदनाचा ‘काळोखाची लेक’, यूजीन ओनीलच्या नाटकाचा ‘पांथस्थ’, वेस्टिंगहाउसच्या चरित्राचा ‘संशोधक जादूगार’ या पदकी यांच्या गाजलेल्या अनुवादासह ‘सात रंगांची कमान माझ्या पापण्यांवर’ हा जपानी भाषेतील काव्याचा अनुवादही वाचकांच्या पसंतीस उतरला. ‘लगनगंधार’ हा त्यांचा अखेरचा कवितासंग्रह ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा