पुणे : मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा कापसाच्या पेरणीत घट झाली आहे. बोगस बियाणे, बोंडअळीमुळे मागील काही वर्षांपासून सरासरी उत्पादनात घट होत आहे. यंदा कापसाला अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकरी कापूस लागवडीकडे पाठ फिरविण्याची शक्यता असल्यामुळे सरकी खाद्यतेल उद्योग सरकीच्या पुरवठ्याविषयी साशंक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात कापूस लागवडीखालील सरासरी क्षेत्र १२८ लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा नऊ जुलैअखेर ७६.१८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. मागील काही वर्षांपासून बोगस बियाणे आणि लाल बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात घट होत आहे. मागील वर्षी १२ हजार प्रति क्विंटलवर असणारे दर, यंदा सरासरी ७ हजार ५०० प्रति क्विंटल राहिले आहेत. शेतकरी कापूस लागवडीकडे पाठ फिरवून तूर, मका आणि सोयाबीनकडे वळत आहेत. त्यामुळे सरकी खाद्यतेल उद्योगाला सरकीचा अपेक्षित पुरवठा होण्याबाबत खाद्यतेल उद्योगातील जाणकार साशंक आहेत.

हेही वाचा – पिंपरी : राहुल कलाटे यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश लांबणीवर; ‘हे’ आहे कारण

सरासरी बारा लाख टन सरकीचे उत्पादन

देशात दर वर्षी सरासरी बारा लाख टन सरकीचे उत्पादन होते. हे सरकी उत्पादन सरकी तेल उद्योगाला वर्षभर पुरवून वापरावे लागते. नवा प्रकल्प उभारताना किंवा प्रकल्पांचा विस्तार करताना सरकीच्या अपुऱ्या पुरवठ्याचा विचार करावा लागतो. अपुरा पाऊस, बोगस बियाणे, बोंडअळी आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी दरामुळे कापूस आणि सरकीच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे. सरकीचे घटते उत्पादन हा सरकी तेल उद्योगासाठी चिंतेचा विषय आहे. सरकीचे उत्पादन वाढल्यास देशांतर्गत सरकी तेलाचे उत्पादन वाढून देश खाद्यतेलाच्या बाबत आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, असे मत द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादी’ची पिंपरी-चिंचवड शहरासाठी कार्यकारी समिती

सरकीची उपल्बधता पाहून पुढचे पाऊल

देशात होणाऱ्या सरकीचे उत्पादन गृहीत धरूनच सरकी तेल उद्योग आपले नियोजन करीत आला आहे. पण, आता कमी होणारे सरकीचे उत्पादन आणि उद्योगातून वाढलेली मागणी याचा मेळ घालणे अवघड जात आहे. सरकीची उपलब्धता पाहूनच यापुढे नवे सरकी तेल प्रकल्प उभारण्याची गरज आहे, अशी माहिती द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) माजी अध्यक्ष भारत मेहता यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarki shortage in front of the edible oil industry know what will be the consequences pune print news dbj 20 ssb