लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) राज्यभरातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा राज्यस्तरीय मेळावा पुण्यात शनिवारी (१३ जानेवारी) होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. मनसेचे राज्यात सुमारे तीन हजार सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला असून, त्यांपैकी कितीजण मेळाव्याला हजर राहतात, याबाबत उत्सुकता असणार आहे.

स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा मेळावा होणार आहे. मेळाव्यास मनसेचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, बाबू वागसकर, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा-कसब्यात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचा ‘जय श्रीराम’चा नारा !

गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मनसेनेही काही ग्रामपंचायतींची सत्ता मिळविली असली, तरी सरपंच आणि सदस्य संख्या सुमारे एक हजाराच्या आसपास असल्याचे ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर निदर्शनास आले होते. मात्र ही संख्या दोन हजार ८०० ते तीन हजारांच्या आसपास असल्याचा दावा मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे.

सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच जिल्हाध्यक्ष आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी; तसेच पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागातील पदाधिकारीही या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader