पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस मदनदास देवी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.  

मदनदास देवी यांचे सोमवारी (२४ जुलै) पहाटे बंगळुरू येथे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबा‌ळे यांनी देवी यांचे पार्थिव पुण्याला आणले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे पार्थिव शनिवार पेठेतील मोतीबाग कार्यालय येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. 

हेही वाचा – पुणे: अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणास २० वर्षे सक्तमजुरी

हेही वाचा – पुणे : खडकवासला धरण भरले; मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू

सरसंघचालक मोहन भागवत यांनी देवी यांना श्रद्धांजली वाहिली. भागवत म्हणाले, की लाखो लाेकांना आपल्यामध्ये सामावून घेणारे मदनदास देवी यांच्या वियोगाचे दु:ख सर्वांना झाले आहे. त्यांनी केवळ संघटन कार्याचा विस्तार केला नाही किंवा संघटनेशी माणसांना जोडले नाही तर, देवी हे प्रत्येकासाठी जवळचे व्यक्तिमत्त्व होते. संघकार्याचे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशातून त्यांनी सर्वांशी स्नेह जोडला. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ते आनंदी होते. ‘पुढे चला’ हा त्यांनी दिलेला मंत्र आत्मसात करून वाटचाल करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.