पुणे : पुण्याच्या संस्थात्मक वैभवामध्ये भर घालत वैचारिक भरणपोषण करून समाजभान जागे ठेवण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी ‘पुणे सार्वजनिक सभा’ ही संस्था कात टाकण्यासाठी सज्ज झाली असून तब्बल दीड शतकांच्या अमूल्य दस्तावेजांना आधुनिकीकरणाचा साज देण्यासाठी उत्सुक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाला संघटित करण्यासाठी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वराज्याचे सुराज्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आणि आधुनिक काळात देशाला महासत्ता करण्याचे स्वप्न सत्यामध्ये उतरविण्यासाठी गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेली पुणे सार्वजनिक सभा आपल्या परीने योगदान देत खारीचा वाटा उचलत आहे. तीन शतकांचा दुवा सांधणारी पुणे सार्वजनिक सभा ही संस्था नव्या वास्तूसह अनमोल अशा दस्तावेजांचे डिजिटीकरणाच्या माध्यमातून जतन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, त्यासाठी संस्थेला आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे.

देश पारतंत्र्यामध्ये असताना पुणेकरांची गाऱ्हाणी सरकार दरबारी पोहोचविण्याच्या उद्देशातून एक व्यापक सभेची स्थापना व्हावी असा निर्णय झाला. ’पुणे सार्वजनिक सभा’ या नावाने वर्ष (प्रतिपदेच्या मुहुर्तावर २ एप्रिल १८७० रोजी स्थापन झालेल्या सभेचे सार्वजनिक काका संस्थापक कार्यवाह होते. श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे सभेचे पहिले अध्यक्ष होते. पुढील काळात काका आणि सार्वजनिक सभा यांचे नाते इतके घट्ट जुळून आले की सभेचे कार्य तेच काकांचे आणि काकांचे कार्य तेच सभेचे असे समीकरणच झाले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, नामदार गोबाळ कृष्ण गोखले, साहित्यसम्राट न. चिं. केळकर, शि. म. परांजपे यांसारखी मातब्बर मंडळी या संस्थेशी जोडली गेल्याने संस्थेच्या कार्याचा परीघ विस्तारला.

सार्वजनिक काका यांच्या निधनानंतर संस्था त्याच उमेदीने कार्यरत आहे. दीडशे वर्षांच्या इतिहासाचा स्मृतिगंध संस्थेने कागदपत्रांच्या रूपाने जतन केला आहे. सार्वजनिक काका, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, शि. म. परांजपे, हरी नारायण आपटे, लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार अशा त्या काळातील थोर व्यक्तींच्या मराठी, इंग्रजी आणि मोडी लिपीमधील स्वाक्षरी असलेले तसेच अन्य संदर्भपत्रे हा अमूल्य खजिना संस्थेच्या संग्रहामध्ये आहे. दीड शतकांमध्ये ही कागदपत्रे जीर्ण झाली असून हाताळणेही अवघड झाले आहे. आधुनिकतेची कास धरत डिजिटीकरणाच्या माध्यमातून हा अनमोल ठेवा जतन करण्याचा संस्थेचा संकल्प असून त्यासाठी समाजाच्या दातृत्वाची आवश्यकता आहे. बुधवार पेठ येथील संस्थेचे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करण्याचा मानस असला तरी ही मोठी खर्चिक बाब असल्याने संस्थेला उदार दात्यांनी अर्थसाह्य करावे, असे आवाहन पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर आणि कार्याध्यक्ष अनिल शिदोरे यांनी केले आहे. दरवर्षी संस्था गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाह्य करते. त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे नारगोलकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाला संघटित करण्याच्या उद्देशातून गणेश वासुदेव जोशी यांनी स्थापन केलेली, तीन शतकांचा दुवा सांधणारी पुणे सार्वजनिक सभानव्या वास्तूसह अमूल्य दस्तावेजांच्या डिजिटीकरणास सज्ज झाली आहे.

बँकिंग पार्टनर दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.

Story img Loader