सफाई कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे ससून सवरेपचार रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेवर कमालीचा ताण येत असल्याचे चित्र आहे. रुग्णालयातील स्वच्छता आणि सुविधांचे तीन-तेरा वाजले असून तीन वॉर्डाचे बांधकाम नव्याने सुरू करण्यात आले असल्यामुळे सतत उडणारी धूळ आणि बांधकामाच्या उपकरणांच्या गोंगाटाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्यामुळे थोडय़ा-थोडय़ा वेळाने रुग्णालयाची सफाई होत राहणे गरजेचे बनले आहे. सध्या बाह्य़रुग्ण कक्षात तसेच वऱ्हांडय़ांमध्ये ठिकठिकाणी कचरा साठून राहात असल्याचे दिसते. कापसाचे बोळे, बँडेजचे तुकडे, अन्नाची रिकामी पाकिटे, खरकटे असा कचरा ठिकठिकाणी विखुरला आहे. रुग्णालयाच्या इमारतीच्या मधल्या चौकांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. या ठिकाणी औषधांची रिकामी खोकी, कागद, प्लॅस्टिकसारखा कचरा पडला असून सांडपाण्याच्या नळ्यांमधून ठिबकणारे पाणीही साठून राहिले आहे. या चौकांत चक्क उंदीरही फिरताना दिसतात. रुग्णालयाच्या मागील बाजूसही औषधाच्या रिकाम्या बाटल्या, अन्नाची रिकामी पाकिटे असा कचरा चहुबाजूला पडला असून तुंबलेल्या पाण्यामुळे दरुगधीही सुटली आहे. या दरुगधीचा त्रास वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णांनाही होताना दिसतो. ३, ९ व १५ क्रमांकाचे वॉर्ड नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे बंद आहेत. बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा सततचा आवाज आणि दिवसभर हवेत उडणारी धूळमाती यामुळे रुग्णालयात थांबणे आणखी त्रासदायक झाले आहे.
 स्वच्छतागृहांची वानवा
रुग्णालयाच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या स्वच्छतागृहाची अवस्था भयंकर आहे. येथे महिलांसाठीचे केवळ एक स्वच्छतागृह सुरू असून दरुगधीमुळे महिलांना ते वापरणे अशक्य झाले आहे. या स्वच्छतागृहाशेजारीच पुरूषांचे स्वच्छतागृह असून या ठिकाणी पुरूषांचे घोळके उभे असतात. या कारणामुळेही स्वच्छतागृह वापरण्यास महिलांना संकोच वाटतो. रुग्णालयाचा तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहांची अवस्था तुलनेने बरी आहे. मात्र याव्यतिरिक्त रुग्णांच्या नातेवाइकांसाठी स्वच्छतागृहेच नाहीत. प्रत्येक वॉर्डमध्ये ६० ते ७० रुग्ण दाखल असतात. या रुग्णांसाठी वॉर्डाच्या आत केवळ ३ स्वच्छतागृहे व १ ते २ स्नानगृहे आहेत. वॉर्ड क्रमांक २३ हा लेबर वॉर्ड आहे. प्रत्येक गर्भवती रुग्णाबरोबर किमान १-२ महिला असतात. त्यांच्यासाठी या ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय नाही.      
रुग्णालयाचे अधीक्षक डी. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘चतुर्थ श्रेणी कामगारांच्या रिक्त जागा भरण्याबद्दल रुग्णालय प्रशासनातर्फे सरकारला बऱ्याचदा प्रस्ताव पाठवला असून तो सरकारकडे प्रलंबित आहे. उपलब्ध सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून त्यांच्यावर ताण पडतो आहे. प्रत्येक मजल्यावरील जुन्या व पडीक स्वच्छतागृहांच्या जागी नवीन स्वच्छतागृहे बांधण्याचा रुग्णालयाचा विचार आहे. प्रवेशद्वारासमोर बँकेच्या अलीकडे असलेल्या स्वच्छतागृहाचेही नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.’’

नव्याने बांधलेली लिफ्ट बंद
 वॉर्ड क्र. २७ मधील (दगडी इमारत) लिफ्ट गेले वर्षभर सुरूच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा क्षयरोगाच्या रुग्णांचा वॉर्ड आहे. या रुग्णांना वैद्यकीय चाचण्यांसाठी नेताना लिफ्ट नसल्यामुळे स्ट्रेचरवर उचलून खाली आणावे लागते. वॉर्डात ४०- ५० रुग्णांमागे एकच कर्मचारी असल्यामुळे हे काम नातेवाइकांनाच करावे लागते. रुग्णाचा मृत्यू झाला तरी मृतदेह बाहेर नेताना हाच प्रश्न उद्भवतो.

Story img Loader