गेल्या कित्येक वर्षांपासून ससून सवरेपचार रुग्णालयात असलेली चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची उणीव या वर्षीही कायम राहिली आहे. सध्या ससूनमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदांपैकी एक-तृतीयांश (३४ टक्के) पदे रिक्तच आहेत. सध्या सेवेत असलेल्या कामगारांवर यामुळे कामाचा ताण पडत असून नागरिकांना मिळणाऱ्या रुग्णसेवेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. रुग्णांना चाचण्यांसाठी नेण्यासारखी एरवी कक्षसेवक करत असलेली कामे अनेकदा रुग्णांच्या नातेवाइकांनाच करावी लागत आहेत.
ससून रुग्णालयातील रिक्त जागांच्या डिसेंबर २०१४ अखेरच्या आकडेवारीनुसार रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ८३८ जागांपैकी ५५१ जागा भरलेल्या असून २८७ जागा अद्यापही रिक्तच आहेत. यात कक्षसेवक या पदाच्या २६१ मंजूर पदांपैकी ११२ जागा रिक्त आहेत. त्याखालोखाल सफाई कामगार, आया, पहारेकरी, चतुर्थश्रेणी सेवक, स्वयंपाकी अशा अनेक पदांच्या जागा कमी-अधिक प्रमाणात रिक्त आहेत.
रुग्णालयातील काही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या मात्र ८० ते ९० असते. विविध कक्षांमध्ये (वॉर्ड) सकाळी २ ते ३ चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात, पण दुपारी व रात्री प्रत्येकी एक किंवा क्वचित दोनच कर्मचारी असतात. रुग्णांना चाचण्यांसाठी घेऊन जाणे, वॉर्डची स्वच्छता करणे, जेवण, चहा, दूध अशा वस्तू आणणे व रुग्णांना वाटणे, कपडे धुवायला टाकणे व धुतलेले कपडे आणणे, औषधे व रुग्णोपयोगी साहित्य आणून देणे ही कामे कक्षसेवक करतात. पण कायम कामगार आणि बदली कामगार या सर्वावरच कामाचा ताण पडत असल्यामुळे सुट्टय़ा घेण्याचे प्रमाणही अधिक आहे. आहे तो कर्मचारी आजारी पडून अचानक सुट्टीवर गेला तर कक्षात कामगारच नसतो. क्ष- किरण तपासणीसारख्या चाचण्या करुन घेण्यासाठी नातेवाइकांनाच रुग्णाला न्यावे लागते.
गेल्या १५ वर्षांत रुग्णालयातील परिचारिकांची पदे दुपटीने वाढली, पण चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मात्र ना अधिक पदे मंजूर झाली, ना आहेत त्या सर्व पदांची भरती झाली, असेही या कामगारांनी सांगितले.
बदली कामगारांचाही प्रश्न प्रलंबित
ससूनमधील ७४ बदली कामगार अनेक वर्षांपासून कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या १५ ते २५ वर्षांपासून हे कामगार बदली कामगार म्हणूनच कामावर आहेत. एका बदली कामगाराने सांगितले, ‘‘ससूनमध्ये ट्रॉमा सेंटर, क्षयरोग विभाग, हृदयरोग शस्त्रक्रिया व अतिदक्षता विभाग, डायलिसिस विभाग एमआरआय विभाग, मिल्क बँक असे विविध विभाग सुरू झाले. पण चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदांमध्ये वाढ झाली नाही. नवीन विभाग सुरू झाला की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली केली जाते. पण मुळातच आधीच्या विभागातही कर्मचारी कमीच असतात. २०१० मध्ये औद्योगिक न्यायालयाने बदली कामगारांना कायम नियुक्ती देण्यासंबंधी आदेश दिला होता, पण कायम नियुक्ती मिळाली नाही. यासंबंधीचा खटला उच्च न्यायालयात अद्याप सुरू आहे. दरम्यानच्या काळात ५ बदली कामगार निवृत्त झाले, तर ८ बदली कामगारांचा मृत्यूही झाला.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा