अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ललित पाटीलवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ललित पाटीलला पळून जाण्यास आणि ससून रूग्णालयात असताना मदत केल्याचा आरोप अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर करण्यात आला आहे. यावर संजीव ठाकूर यांनी भाष्य केलं आहे.
‘टीव्ही ९ मराठी’ला माहिती देताना संजीव ठाकूर म्हणाले, “अधिष्ठाता कॉलेज आणि रूग्णालयाची देखरेख करण्याचं काम करतात. व्यवस्थापक, मेडिकल व्यवस्थापक यांचा पूर्ण रूग्णालयावर ताबा असतो. डॉक्टरांचं काम हे रुग्णावर उपचार करणं असतं. पळवून लावण्यात कुठल्या डॉक्टरचा हात असेल, असं मला वाटत नाही. कोण काय बोलतं, यावर भाष्य करू शकत नाही.”
हेही वाचा : Lalit Patil : ललित पाटील कोण आहे? छोटा राजन गँगच्या गुंडांशी संपर्कात येत कसा झाला ड्रग माफिया?
“ललित पाटीलसारखे असंख्य आरोपी आमच्याकडे येत असतात. माझ्यासह कुठल्याही डॉक्टरचा कधीही संबंध नव्हता आणि येणार नाही. आरोप करणाऱ्यांकडे पुरावा पाहिजे. मर्यादा असल्यानं आम्ही बोलू शकत नाही. कुठल्याही रूग्णाला चांगले उपचार मिळाले पाहिजेत, हेच आमचं काम आहे. ललित पाटीलला पळवून लावण्यात आणि आर्थिक हितसंबंधामध्ये कुठल्याही डॉक्टरचा हात नाही,” असे संजीव ठाकूर यांनी सांगितलं.
हेही वाचा : ललित पाटीलवर नऊ महिने उपचार, पण नेमका कोणता आजार झाला होता? अधिष्ठातांनी दिली महत्त्वाची माहिती
ललित पाटील व्हीआयपी उपचार मिळण्यासाठी मंत्र्याचा फोन येत होता का? या प्रश्नावर संजीव ठाकूर म्हणाले, “कुठल्याही राजकीय नेत्यानं मला फोन केला नाही. आरोपीला व्हीआयपी उपचार दिले नाहीत. रूग्णावर देखरेख करण्यासाठी नर्सेस असतात. रूग्णाचा ताबा पोलिसांकडे असतो.”