पुणे: ससून सर्वोपचार रुग्णालयातील वाहनतळ ठेकेदाराने वर्षभरात १६ लाख ७६ हजार रुपयांचा गंडा प्रशासनाला घातल्याची बाब लोकसत्ताने उघडकीस आणली होती. यानंतर ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी वाहनतळ ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी बंडगार्डन पोलिसांना पत्र पाठविले आहे. याचबरोबर ठेकेदाराकडून वाहनतळ काढून घेण्याचे पाऊलही रुग्णालय प्रशासनाने उचलले आहे.
ससून रुग्णालयातील वाहनतळ चालविण्याचे कंत्राट संदीप चंद्रकांत केदारी यांच्या एस.के. एंटरप्रायजेस या कंपनीला नोव्हेंबर २०२० मध्ये देण्यात आले होते. हे कंत्राट दोन वर्षांसाठी होते. या कंत्राटाची मुदत मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आली. त्यानंतर ठेकेदाराला नवीन ठेकेदार नेमला जाईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तेव्हापासून ठेकेदाराने मागील वर्षभरात प्रशासनाला कोणतेही शुल्क दिले नाही.
वाहनतळापोटी कंत्राटदाराने रुग्णालयाला महिन्याला १ लाख ५१ हजार ५०० रुपये शुल्क देणे आवश्यक आहे. मात्र, मागील वर्षभराचे शुल्क न भरताच त्याच्याकडून वाहनतळ चालविला जात होता. कंत्राटदाराने पाच धनादेशही प्रशासनाला दिले होते. हे धनादेश बँकेत वटले नाहीत. एकूण १६ लाख ६७ हजार रुपये ठेकेदाराने प्रशासनाला दिलेले नाहीत. यामुळे ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी बंडगार्डन पोलिसांना पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.
उलट रुग्णालयाला भुर्दंड
वाहनतळ कंत्राटदाराने ससून रुग्णालयाला पाच धनादेश दिले होते. ठेकेदाराने शुल्क थकविल्याने या वर्षाच्या अखेरीस प्रशासनाने धनादेश बँकेत वटविण्याचे पाऊल उचलले. याबाबत ठेकेदाराला पूर्वसूचनाही देण्यात आली होती. तरीही हे धनादेश वटले नाहीत. धनादेश न वटल्याप्रकरणी प्रति धनादेश २९५ रुपये असा एकूण १ हजार ४७५ रुपयांचा दंड बँकांकडून रुग्णालय प्रशासनाला झाला. यामुळे ठेकेदाराकडून पैसे तर दूरच उलट भुर्दंड सहन करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली.