पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला सरासरी २४ रुग्णांचा मृत्यू होत असून, गेल्या वर्षी ८ हजार ८७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही बाब ‘लोकसत्ता’ने समोर आणली होती. यानंतर खडबडून जागे झालेल्या ससून प्रशासनाने याप्रकरणी सत्यशोधन समिती नेमण्याचे पाऊल उचलले आहे. ससूनचे नवीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी ही समिती गुरुवारी स्थापन केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी राज्यात सर्वाधिक ८ हजार ८७५ मृत्यू ससून रुग्णालयात झाल्याची नोंद आहे. याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. काळे यांनी सत्यशोधन समिती नेमण्याची घोषणा बुधवारी केली होती. मात्र, त्यानंतर लगेचच डॉ. काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी रुग्ण मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली.

हेही वाचा: ससूनचे नवीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के पदभार स्वीकारताच म्हणाले…

ससून रुग्णालयाची सध्या रुग्णशय्येची क्षमता सुमारे १८०० आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ही नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त असते. रुग्णालयात आंतररुग्ण विभागात दररोज सुमारे १८० रुग्ण दाखल होतात. याच वेळी बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अडीच हजारांहून अधिक आहे. दररोज रुग्णालयातून सुमारे १६० रुग्णांना घरी सोडले जाते. रुग्णालयात दररोज सरासरी २४ रुग्णांचा मृत्यू होत आहे.

हेही वाचा: ससूनमधील रक्ताच्या नमुन्यांचे गौडबंगाल अखेर उघड! चौकशी समितीच्या अहवालात मोठा खुलासा

इतर रुग्णालयांतून जास्त रुग्ण?

ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांतून रुग्ण ससून रुग्णालयात पाठविले जातात. त्याचबरोबर पुणे शहर आणि जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांतूनही गंभीर रुग्ण ससूनमध्ये पाठविले जातात. ससूनमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी थेट दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४० टक्के आहे. इतर रुग्णालयांतून दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६० टक्के असून, त्यातील निम्मे रुग्ण हे ४८ तासांत दगावतात, असा दावा ससून रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sassoon hospital dean dr chandrakant mhaske on deaths of 24 patients per day at sassoon pune print news stj 05 css