संजय जाधव
पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याच्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. यात ससून रुग्णालयाचे व्यवस्थापन संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती नियुक्त केली. आता या समितीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या समितीतील काही सदस्यांची इतर प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असल्याने त्यांच्या नावाला आक्षेप घेतला जात आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आहेत. समितीच्या सदस्यपदी सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले आणि मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती १५ दिवसांत चौकशी करून सरकारला अहवाल सादर करणार आहे.
आणखी वाचा-बांधकाम व्यावसायिकाची ६६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून बिहारमधील दोघांना अटक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयातील कैदी रुग्णाच्या पलायन प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून ससून रुग्णालयाचे नाव खराब होत आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, समितीत वैद्यकीय आयुक्तांऐवजी प्रभारी संचालकांना अध्यक्ष करण्यात आले आहे. याचबरोबर समितीतील काही जणांची सध्या इतर प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. म्हैसेकर यांचे एक प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे तर पवार यांच्यावर लेखापरीक्षण अहवालात ठपका ठेवण्यात आल्याने त्यांचीही चौकशी सुरू आहे. अशा सदस्यांना समितीत स्थान दिल्याने एकूणच चौकशीबाबत आताच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक अधिष्ठाता दुसऱ्या अधिष्ठात्याची चौकशी कशी करणार?
या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. दिलीप म्हैसेकर यांची नियुक्ती झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हैसेकर हे प्रभारी संचालक आणि नांदेडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आहेत. त्यामुळे ससूनच्या अधिष्ठात्यांच्या चौकशी समकक्ष असलेला दुसरा अधिष्ठाता कसा करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
समितीबाबत उपस्थित झालेले प्रश्न
- सर्व अधिकारी वैद्यकीय शिक्षण विभागातीलच कसे?
- आधीपासून चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना स्थान का?
- वैद्यकीय आयुक्तांकडे समितीचे अध्यक्षपद का नाही?
- कनिष्ठ अधिकारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी कशी करणार?
- इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश का नाही?
ससून रुग्णालयात ललिल पाटीलवर एवढे दिवस कोणते उपचार सुरू होते, ते का सुरू होते, त्यात डॉक्टर दोषी आहेत का, याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. उपचाराशी निगडित विषय असल्याने त्यात सर्व डॉक्टरांचा समावेश आहे. या समितीचा चौकशी अहवाल समाधानकारक न वाटल्यास पुन्हा समिती नेमून चौकशी होईल. पोलीस आणि कारागृह प्रशासनाबाबत चौकशीचा निर्णय गृह मंत्रालय घेईल. -हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण व संशोधन
ससून रुग्णालयातील अमली पदार्थ तस्करी प्रकरणाच्या चौकशीत वैद्यकीय शिक्षण विभागातीलच समकक्ष अधिकारी नेमले आहेत. ही समिती हा केवळ चौकशीचा फार्स असून, त्यातून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. -रवींद्र धंगेकर, आमदार