पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल रुग्णाचा उंदराने चावा घेतल्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालावर वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी अखेर कारवाई केली आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली असून, तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
सागर दिलीप रेणुसे (वय ३०) या रुग्णाला १ एप्रिलला अतिदक्षता विभागात उंदीर चावल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. त्याच रात्री रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात २ एप्रिलला करण्यात आले. त्यात मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. चौकशी समितीने शवविच्छेदन अहवालासह इतर बाबींची चौकशी केली. हा अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे सादर केला होता.
हेही वाचा :पिंपरी : विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचा अभाव; दोन वर्षांनंतरही पालिकेची स्थानके कागदावरच!
डॉ. म्हैसेकर यांनी या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांसह तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली होती. या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी कारवाईचे पाऊल उचलले. या प्रकरणी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना तत्काळ पदावरून हटविण्यात आले आहे. याचबरोबर तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना निलंबन का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना यावर उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारसही राज्य सरकारकडे करण्य़ात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा :निवडणुकीमुळे उत्तरेकडील रेल्वे गाड्यांत गर्दीचा महापूर! तिकीट विक्री बंद करण्याची रेल्वेवर वेळ
ससून रुग्णालयात रुग्णाला उंदीर चावल्याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना पदावरून हटविण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून, नवीन अधीक्षक नेमण्याचे आदेश रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना देण्यात आले आहेत.
– डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग