पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालय हे अतिशय महत्त्वाचे आहे. दररोज हजारो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, गेल्या १० महिन्यांपासून या रुग्णालयाचा कारभार अधांतरीच आहे. रुग्णालयाचे कामकाज प्रभारी अधिष्ठात्यांकडे असून एवढ्या काळात अद्याप पूर्णवेळ अधिष्ठाता नेमण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ या पुण्यातील असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.

गेल्या दोन वर्षांत ससूनमध्ये गैरप्रकारांची मालिका सुरू होती. त्यामुळे एकही व्यक्ती स्थिरपणे अधिष्ठात्यांच्या खुर्चीत टिकून राहिली नाही. अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील पलायन प्रकरणात नोव्हेंबर २०२३ मध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर तातडीने डॉ. विनायक काळे यांच्याकडे अधिष्ठातापदाची सूत्रे देण्यात आली. डॉ. काळे यांच्या कार्यकाळात पोर्श अपघात प्रकरणातील आरोपीचे रक्तनमुने बदलण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी ससूनमधील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना अटक करण्यात आली. याच प्रकरणात गेल्या वर्षी मे महिन्यात डॉ. काळे यांना अधिष्ठाता पदावरून हटवून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.

डॉ. काळे यांच्यानंतर ससूनच्या प्रभारी अधिष्ठातापदी डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची गेल्या वर्षी मे महिन्यात नेमणूक करण्यात आली. डॉ. म्हस्के यांच्याकडे आधीपासून बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार होता. त्यांच्याकडे ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. विशेष म्हणजे, एकाच महिन्याच्या आत जूनमध्ये डॉ. म्हस्के यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला. त्या जागी मुंबईतील जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे ससूनचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

गेल्या वर्षी जून महिन्यापासून डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. अद्यापपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाने पूर्णवेळ अधिष्ठाता नेमण्याची तसदी घेतलेली नाही. ससूनमधील या प्रभारी कामकाजामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गंभीर परिणाम होत आहे. याबाबत भाजपचे आमदार डॉ. सिद्धार्थ शिरोळे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात मुद्दा मांडला होता. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाने त्या दिशेने पावले उचललेली नाहीत.

मंत्र्यांची एकदाही ससूनला भेट नाही

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय येते. या विभागाचे राज्यमंत्रिपद माधुरी मिसाळ यांच्याकडे असून त्या पुण्यातील आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ससून रुग्णालयाला अद्यापर्यंत एकदाही भेट दिलेली नाही. ससून रुग्णालयातील अधिष्ठाता नियुक्तीपासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. असे असतानाही मंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. याबाबत मंत्री मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

ससूनचे अस्थिर अधिष्ठातापद

  • नोव्हेंबर २०२३ – अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर पदमुक्त.
  • मे २०२४ – पोर्श अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्तनमुने अदलाबदल प्रकरणात डॉ. विनायक काळे सक्तीच्या रजेवर.
  • मे २०२४ – बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार.
  • जून २०२४ – मुंबईतील जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार.