पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदावरून सुरू असलेला गोंधळ आणखी वाढला आहे. आता एका सहयोगी प्राध्यापकाने थेट वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्र लिहून पदाची मागणी केली आहे. विद्यमान अधीक्षक या पदासाठी पात्र नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाने अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याकडून तातडीने अहवाल मागविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. अजय तावरे यांची गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नियुक्ती करण्यात आली. डॉ. तावरे हे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक असून, ते न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. तावरे हे या पदासाठी पात्र नसल्याचा दावा आधीचे अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी केला आहे. त्यांनी याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिले आहे. त्यात आपली अधीक्षकपदी नियुक्ती करावी, अशी थेट मागणी डॉ. जाधव यांनी केली आहे. यावर वैद्यकीय शिक्षण विभागाने अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना पत्र लिहून त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे.

हेही वाचा…बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा ; येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी सीईटी सेलकडून अंमलबजावणी

गेल्या वर्षी अधीक्षकपदावरून डॉ. यल्लप्पा जाधव यांना हटविण्यात आले होते. ते सहयोगी प्राध्यापक आहेत. त्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत ससूनमधील एक कर्मचारी सापडला होता. त्यामुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी डॉ. जाधव यांना पदावरून हटविले होते. आता अधीक्षकपद मिळावे, यासाठी डॉ. जाधव यांनी थेट मंत्र्यांकडे धाव घेतली आहे. अधीक्षक नियुक्तीचा अधिकार अधिष्ठात्यांना असतो. ते बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक अथवा प्राध्यापकाची नियुक्ती या पदावर करतात. हे पद महत्त्वाचे असून, त्यावरील व्यक्तीला अनेक अधिकार मिळतात. त्याचबरोबर या पदाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार होत असल्याचीही चर्चा सुरू आहे. थेट मंत्र्यांकडे शिफारशीद्वारे अथवा पत्र लिहून पद मागण्याचे प्रकार वाढल्याने याबाबत ससूनमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा…पिंपरी : पाण्याचा गैरवापर केल्यास नळजोड खंडित करणार; महापालिकेचा इशारा

ससून रुग्णालयाचा अधीक्षक हा सहयोगी प्राध्यापक असावा, असा राज्य सरकारचा निकष आहे. विद्यमान अधीक्षक हे प्राध्यापक आणि विभागप्रमुख आहेत. त्यामुळे कनिष्ठ असलेल्या अधीक्षक पदासाठी ते पात्र नाहीत. – डॉ. यल्लप्पा जाधव, सहयोगी प्राध्यापक, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या रुग्णालयाच्या अधीक्षकपदाबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना आहेत. अधीक्षक हा प्राध्यापक असावा आणि त्याला किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. त्यामुळे मी या पदासाठी पात्र आहे. – डॉ. अजय तावरे, अधीक्षक, ससून रुग्णालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sassoon hospital superintendent appointment sparks controversy dr yallappa jadhav seeks change in letter to minister pune print news stj 05 psg
Show comments