जेजुरी : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या केसरयुक्त विमल पान मसाला, व सुगंधी तंबाखूच्या पाकिटांची पोती घेऊन बोपदेव घाटमार्गे पुण्याला जाणारी एक इर्टिगा गाडी सासवड पोलिसांनी मध्यरात्री सापळा लावून पकडली. या गाडीमध्ये बंदी घातलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूची एक लाख रुपयाची पाकिटे आढळून आली ही पकिटे पोत्यामध्ये बांधून नेण्यात येत होती.हा मुद्देमाल व मालाची वाहतूक करणारी बारा लाख रुपये किमतीची इर्टिगा गाडी सासवड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे अजूनही महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या अपायकारक केसरयुक्त विमल पान मसाला व इतर सुगंधीत तंबाखूची छुप्या मार्गाने विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.
सासवड पोलिसांनी या प्रकरणी पांढऱ्या रंगाची इर्टिगा गाडी व चालक ईश्वर बळवंत पाटील ,(वय ४३, रा. आकृती हाउसिंग सोसायटी, टिळेकरनगर , कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले आहे.दिनांक ६/३/२०२५ रोजी मध्यरात्री सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जेजुरी मार्गाने येऊन एक इर्टिगा गाडी केसर युक्त विमल गुटखा आणि सुगंधी तंबाखूची पोती घेऊन बोपदेव मार्गे पुण्याला जाणार आहे ,ही खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी.
पोलीस हवालदार जब्बार सय्यद व गणेश पोटे यांना भिवरी जवळील ऑस्करवाडी येथे नाकाबंदी करण्याची सूचना केली. काही वेळातच या ठिकाणी एक इर्टिगा गाडी(क्र.एमएच१२डब्ल्यूझेड ९२४६ ) पुण्याकडे जाताना दिसली, या गाडीला थांबवून गाडीची तपासणी केली असता या गाडीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या केसरयुक्त विमल पान मसाला नावाच्या गुटक्याची दहा पोती,व्ही-वन टोबॅको नावाच्या सुगंधी तंबाखूची दोन पोती व तुलसी 00 रॉयल जाफरानी जर्दा तंबाखूचे एक पोते असा मुद्देमाल आढळून आला .पकडण्यात आलेल्या गुटखा व तंबाखूची पोती यांची किंमत ९९ हजार ८१४ आहे. हा मुद्देमाल व १२ लाख रुपयांची पांढऱ्या रंगाची मारुती इर्टिगा गाडी जप्त करण्यात आली आहे .सासवड पोलिसांना मध्यरात्री बातमी मिळताच तातडीने सापळा रचल्याने बंदी असलेल्या बेकायदेशीर गुटखा व तंबाखूची पोती पकडण्यात पोलिसांना यश आले.उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे व पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरज नांगरे, लियाकत अली मुजावर, जब्बार सय्यद पोलीस नाईक गणेश पोटे ,अक्षय चिले यांच्या पथकाने ही कामगिरी केली
सासवड पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटका व सुगंधी तंबाखूची पाकिटे असलेली पोत्यांची वाहतूक करताना पकडलेल्या गाडी बाबत सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणेश विलास पोटे यांनी फिर्याद दिली आहे.त्याप्रमाणे भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२३,२२३ सह कलम अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००६ व नियमन २०११ चे कलम २६(२), २६.(२)(ए) २७.(३)(डी). २७(३)(इ) ४९ प्रमाणे सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिबंध घालण्यात आलेल्या गुटखा व तंबाखूची पोती कोठून आली व कोणाकडे नेण्यात येत होती याचा अधिक तपास सासवड पोलीस करीत आहेत.