अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अद्यापही लागला नाही, या घटनेचा मुख्य मंडपामध्ये जाहीर निषेध करायला हवा, अशी मागणी विद्या बाळ यांनी केली. त्या वेळी दाभोलकर यांच्या हत्येचा आणि तपासातील दिरंगाईचा खुल्या अधिवेशनातील ठरावाद्वारे निषेध केला जाईल, अशी ग्वाही साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.
साहित्य संमेलनात ‘परिवर्तनवादी साहित्य-काळाची गरज’ या विषयावर विद्या बाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात विनोद शिरसाठ, किशोर बेडकीहाळ, रतनलाल सोनग्रा आणि श्रीपाल सबनीस यांनी सहभाग घेतला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उभे ठाका, असा सल्ला संमेलनाच्या उद्घाटकांनी दिला खरा. पण, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी याआधी जेव्हा हल्ले झाले तेव्हा राजसंस्था तर पाठीशी उभी राहिली नाहीच. पण, साहित्य संस्थादेखील पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत या वास्तवावर बेडकीहाळ यांनी बोट ठेवले. परिवर्तनवादी साहित्य एका आवर्तामध्ये सापडले आहे असे सांगत श्रीपाल सबनीस यांनी आपल्याला पुरोगामी म्हणवणाऱ्या शरद पवार यांचे नितीन गडकरी यांच्याशी असलेले आíथक संबंध परिवर्तनवादी आहेत, असे लोकांनी मानायचे का, असा प्रश्न उपस्थित केला.
दाभोलकरांच्या लेखनाचे महत्त्व साहित्य संस्था आणि शिक्षण व्यवस्थेने जाणून घेतलेले नाही, अशी खंत व्यक्त करीत विनोद शिरसाठ यांनी हे लेखन मारुती चित्तमपल्ली यांच्या लेखनाप्रमाणेच साहित्याचे एक नवे दालन असल्याचे सांगितले. सध्याच्या काळात संयतपणे विवेकाची भूमिका मांडणे अवघड झाले असल्याचे मत सोनग्रा यांनी व्यक्त केले. परिवर्तनवादी साहित्य ही समाजाची निरंतर गरज असल्याचे विद्या बाळ यांनी सांगितले. हिंदुत्वाचे झेंडे घेत जुन्या परंपरांच्या नावाखाली महिलांचे शोषण केले जात आहे. जणू रिकामा वेळ महिलांकडेच आहे या जाणिवेतून अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी १५ हजार महिलांना रस्त्यावर आणले जात आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा