पुणे : ‘आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रकपदाचा बहुमान साताऱ्याला द्यावा,’ अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी साहित्य महामंडळाकडे केली. ‘हा निर्णय साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती घेत असते. मात्र, संमेलन कोठेही झाले, तरी ते पश्चिम महाराष्ट्रामध्येच होईल,’ असे सांगतानाच ‘गेल्या दहा वर्षांपासून साताऱ्याहून मागणी होत असून, साहित्य महामंडळ त्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करेल’, अशी ग्वाही साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
सरहद, पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, उद्घाटक नरेंद्र मोदी आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणावर आधारित ‘मु. पो. तालकटोरा’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरहद संस्थेचे संजय नहार, शैलेश पगारिया, श्रीराम पवार आणि शैलेश वाडेकर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या भोसले यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
भोसले म्हणाले, ‘३२ वर्षांपूर्वी म्हणजे १९९३ मध्ये सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आले होते, त्या वेळी अभयसिंह महाराज यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले होते. आता साताऱ्याला संमेलन दिले, तर त्याच पद्धतीने आम्ही नियोजन करू. पण, संमेलनात वाद होणारच नाही, याची खात्री देऊ शकत नाही. साताऱ्याच्या वादांचा डब्बा आम्ही कायमचा बंद केला आहे. बाहेरून वाद झाले, तर ते सांगू शकत नाही.’
‘एखाद्या मंत्र्याचा आंदोलक म्हणून स्वागत व सत्कार इतिहासात पहिल्यांदाच झाला असेल,’ अशी टिप्पणी भोसले यांनी केली. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात मराठी भाषिकांना खुला प्रवेश मिळण्यासाठी, तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची सोय करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जोशी म्हणाले, ‘दिल्लीच्या साहित्य संमेलनात विविध विचारधारांची आणि मतांची माणसे व्यासपीठावर होती. आपल्या विचारांशी ठाम राहतानाही त्यांच्यातील सौहार्द आणि वैचारिक मोकळेपणाचे दर्शन घडले. महाराष्ट्राच्या हितासाठी पक्ष, विचारधारा आणि राजकारण दूर ठेवून महत्त्वाच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची मानसिकता आणि राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली, तरच महाराष्ट्राचे भले होईल. देशाला विचार आणि दिशा देणारे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख जपली पाहिजे.’
मराठी भाषेची ओळख कधीच पुसली जाणार नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणे हा एकच ध्यास घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेसह सर्वांनी प्रयत्न केले. दिल्लीतील आंदोलन, तसेच सतत पाठपुरावा करून या इच्छेला मूर्त स्वरूप मिळाले आहे. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी केले, याचे कौतुक आहे. महाराष्ट्र आता मागे वळून पाहणार नाही. दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राची पकड घट्ट झालेली पाहायला मिळेल. – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री