पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींची पूर्वसूचना देणारी ‘सतर्क’ ही सुविधा १५ ऑगस्ट पासून सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) या संस्थेतर्फे पुरवण्यात येणार आहे.  http://www.satarkindia.wordpress.comया संकेतस्थळावर ही माहिती विनामूल्य उपलब्ध असून या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांचा एकत्रित सहभाग असणार आहे.
‘सीसीएस’ चे सचिव मयूरेश प्रभुणे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
या प्रकल्पाविष़ी सांगताना प्रभुणे म्हणाले, की साधारणपणे १०० मिमी पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता सर्वाधिक असते. या प्रकल्पात प्रथम महाराष्ट्रातील दरडप्रवण क्षेत्रांचा नकाशा बनवण्यात येणार आहे, तो अधिक अचूक असावा यासाठी स्थानिक नागरिकांना त्यात सामावून घेतले जाणार आहे. त्यानंतर  ‘नासा’ च्या ‘टीआरएमएम’कडून मिळालेली पावसाची अद्ययावत माहिती, ‘इस्रो’ व भारतीय हवामान विभागाची ‘रॅपीड’ ही यंत्रणा , गुगल अर्थ यांचा वापर यात केला जाणार आहे. यामुळे ज्या ठिकाणी १०० मिमी अथवा त्याहून जास्त पाऊस पडेल, त्या ठिकाणांना किमान एक दिवस आधी ‘सतर्क’ करणे शक्य होणार आहे.
मोठय़ा पावसाच्या काळात ‘सतर्क’कडून पावसाची तीव्रता व प्रमाणानुसार दिवसातून तीन वेळा स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांना ‘वॉच’, ‘वॉर्निग’ व ‘अलर्ट’ या प्रकारात सूचना विनामूल्य देण्यात येणार आहेत. तसेच, ही माहिती संकेतस्थळ, फेसबुक, ट्विटर या माध्यमांद्वारेही देण्यात येणार आहे.
आपापल्या भागातील दरडींची माहिती देण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी ९९२२९२९१६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा