‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्रोने) बनवलेल्या ‘लिथियम आयन बॅटरी’चा ‘इलेक्ट्रिक’ मोटारींमध्ये वापर करता येईल का, यावर ‘ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’कडून (एआरएआय) संशोधन सुरू आहे. सध्या प्रचंड खर्चिक असलेल्या या बॅटरीची किंमत आयात केलेल्या बॅटरीपेक्षा कमी करण्यासाठी इस्रोकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
‘एआरएआय’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षांरंभाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’चे संचालक डॉ. के. सिवन, एआरएआयच्या संचालक रश्मी उध्र्वरेशे, ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, रवी चोप्रा या वेळी उपस्थित होते. या वेळी सिवन व उध्र्वरेशे यांनी या संशोधनाविषयी माहिती दिली.
के. सिवन म्हणाले,‘इस्रोने उपग्रह व ‘लाँच व्हेइकल’साठी ‘लिथियम बॅटरी’ बनवली आहे. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरता येईल का, याबाबत इस्रो व एआरएआय एकत्र काम करत आहेत. अपुरा इंधनसाठा आणि वाढते प्रदूषण या परिस्थितीत सर्व वाहने इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रिक हायब्रिड या प्रकारात परिवर्तित करण्याचा पर्याय असू शकतो. इस्रोने एआरएआयला बॅटरी पुरवल्यानंतर प्रयोगशाळेतील व वाहनांवरील चाचण्या केल्या जातील. बॅटरी बनवताना इस्रोच्या अपेक्षा वेगळ्या होत्या, त्यामुळे ही बॅटरी तूर्त प्रचंड खर्चिक आहे. आयात बॅटरी सेलपेक्षा देशी बॅटरीची किंमत कमी करणे हे आमचे लक्ष्य आहे.’
रॉकेट उडवताना त्याद्वारे निर्माण झालेल्या उष्णतेचा रॉकेटवर परिणाम होऊ नये म्हणून इस्रोने अग्निरोधक रंग बनवला आहे, तसेच काही आठवडय़ांपूर्वीच एक द्रवरोधक पदार्थ (सुपर हायड्रोफोबिक मटेरिअल) बनवण्यात आला असून त्याचाही उद्योगात वापर करता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
वाहन प्रदूषणाचे प्रत्यक्ष मोजमाप होणार
प्रत्यक्ष रस्त्यावर वाहन चालवताना त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे शास्त्रीय मोजमाप करून त्याबद्दलची माहिती सरकारला उपलब्ध करून दिली जाईल असे उध्र्वरेशे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘वाहनांच्या प्रदूषणासाठीचे र्निबध ठरवण्यासाठी अशी माहिती गोळा करणे अतिशय महत्त्वाचे असून अवजड उद्योग मंत्रालयाने एआरएआयला हा अभ्यास करण्यास सांगितले आहे. यात डिझेलवर चालणाऱ्या गाडय़ांच्या प्रदूषणाबद्दल माहिती गोळा करून त्याची आताच्या प्रदूषण र्निबधांशी तुलना केली जाईल.’
वाहन तंत्रज्ञानावर पुण्यात संग्रहालय उभारले जाणार आहे, तसेच चाकण येथे एआरएआयच्या नवीन केंद्राचे सोमवारी उद्घाटन करण्यात येणार असून तिथे तीन प्रयोगशाळा चालवल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक आवश्यक- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले, ‘दिल्लीतील हवाप्रदूषण तसेच महाराष्ट्रात हवामानबदलामुळे शेतीची बदललेली परिस्थिती व दुष्काळ यात टिकाव धरण्यासाठी हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठी उत्पादक म्हणून काम करण्याची संधी आता आहे.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा