पुणे : मुलांना मराठी शाळेत शिकवण्याचा न्यूनगंड आमच्यावेळच्या पालकांमध्ये नव्हता हे आमचे भाग्य आहे. नंतरच्या काळात पालकांमध्ये तो न्यूनगंड आला असावा. त्यामुळे, त्यांनी मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यास सुरुवात केली. पण, मराठी शाळेत शिकून कुणाचे काही नुकसान होत नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी बुधवारी मांडले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात आळेकर बोलत होते. ज्येष्ठ उद्योजिका स्मिता घैसास, माजी विद्यार्थी प्रभाकर भावे, शाळा समिती अध्यक्षा डॉ. प्राची साठे, सदस्य प्राजक्ता प्रधान, राजश्री ठकार, रवी आचार्य, मुख्याध्यापिका कल्पना वाघ, माजी ज्येष्ठ शिक्षिका कुसूम सोहोनी, संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम आदी या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात शाळेच्या नव्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांच्या हस्तलिखितांचे प्रकाशनही करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
आळेकर म्हणाले की, नवीन मराठी शाळेने आम्हाला आकार दिला. १९५८ मध्ये शाळेतून चौथी उत्तीर्ण झाल्यावर काही वर्षे शाळेच्या मैदानावर स्काऊटसाठी येत होतो. शाळेत असताना केलेल्या ‘वयम मोठम् खोटम्’ या नाटकातून पहिल्यांदा रंगभूमीवर जाण्याची संधी मिळाली. शाळेने वाचनाची गोडी, कलेकडे पाहण्याची दृष्टी दिली. आमच्या संवेदनेला शिक्षकांनी खतपाणी घातले. मराठी शाळेत शिकलेले कित्येक लोक आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. इंग्रजी भाषेच्या शाळेत अधिक व्यक्तिमत्व विकास होईल, असे आज पालकांना वाटते. मात्र, हे वातावरण बदलेल, असा विश्वास वाटतो. मराठी संस्कृती, वाड़मय, नाटक यासाठी मराठी भाषेचे शिक्षण घेणे आवश्यक आहे.
नवीन मराठी शाळेने संस्कृती जपताना काळानुरूप बदलांचा स्वीकार केला. शेती, भाषिक कौशल्याचे उपक्रम राबवले. आत्मनिर्भर भारतासाठी अधिकाधिक उद्योजक निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा घैसास यांनी व्यक्त केली.