रंगभूमीच्या प्रारंभापासून मराठी नाटक हे सदैव समांतर धारेमध्येच व्यक्त झाले आहे. अगदी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे ‘कीचकवध’ असो किंवा ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘सखाराम बाइंडर’ यांसारखी नाटके असोत. समांतर धारेची अभिव्यक्ती हेच मराठी नाटकांचे बलस्थान आहे, अशी भावना ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी सोमवारी व्यक्त केली. तिकीट काढून नाटक पाहणे ही मराठी माणसाची श्रद्धा आहे. मराठीतील प्रायोगिक नाटकांची चळवळ प्रेक्षकांनी जगविली. म्हणूनच प्रायोगिक नाटके व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी होत आहेत, असेही ते म्हणाले.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ उपक्रमांतर्गत सतीश आळेकर यांनी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. इंडियन एस्प्रेसच्या निवासी संपादक सुनंदा मेहता यांनी आळेकर यांचे स्वागत केले.
भारतीय रंगभूमी ही प्रादेशिक भाषांमध्येच आहे. हे आपले सामर्थ्य आहे. विजय तेंडुलकर, मोहन राकेश, गिरीश कार्नाड, बादल सरकार, रतन थिय्यम ही नावे प्रादेशिक रंगभूमीतूनच नावारूपास आली. या भाषांमध्ये उत्तम देवाणघेवाण झाल्यामुळे हे नाटककार देशभर पोहोचले, असे ते म्हणाले.
नाटय़ शिक्षण आवश्यक आहे, असेच आपले मत असून, त्याच उद्देशातून पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुखपद स्वीकारले. मुक्ता बर्वे, उपेंद्र लिमये, शर्वरी जमेनीस हे कलाकार, मिलिंद कुलकर्णी, सुयोग कुंडलकर हे संवादिनीवादक येथून घडले आहेत.
विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार हे नाटककार नाटक लिहिले की त्यापासून वेगळे होऊन हे नाटक दिग्दर्शकाला देतात. माझी नाटके मात्र मीच दिग्दर्शित केली. त्यामध्ये अभिनय केला आणि संस्था देखील चालविली. आता तसा कलाकारांचा संच उरला नाही. आहेत त्यांनी वयाची साठी पार केल्यामुळे ते सक्रिय नाहीत. त्यामुळे मी ‘एक दिवस मठाकडे’ हा माझा नवा दीर्घाक निपुण धर्माधिकारी याच्याकडे दिला. त्याने तो प्रयोग उत्तम केला, असे सांगून आळेकर म्हणाले, प्रायोगिक रंगभूमी चळवळीमध्ये नव्या तरुणाईचा उदय झाला आहे. ही युवा पिढी टेक्नॉ-सॅव्ही म्हणजेच तंत्रज्ञानाभिमुख आहे. मोहित टाकळकर, निपुण धर्माधिकारी, धर्मकीर्ती सुमंत, आलोक राजवाडे यांसारख्या युवा रंगकर्मीमुळे मराठी रंगभूमीचे भविष्य उज्ज्वल आहे.
आविष्कार स्वातंत्र्याचा संकोच
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन, या डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांच्या वक्तव्यासंदर्भात ‘आपल्याला हवे तसेच सरकार मिळते,’ अशी टिप्पणी सतीश आळेकर यांनी केली. याचा अर्थ मी मोदीसमर्थक आहे, असा नाही, असा खुलासा त्यांनी केला.
समांतर धारेची अभिव्यक्ती हेच मराठी नाटकांचे बलस्थान – सतीश आळेकर
मराठीतील प्रायोगिक नाटकांची चळवळ प्रेक्षकांनी जगविली. म्हणूनच प्रायोगिक नाटके व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी होत आहेत, असे सतीश आळेकर म्हणाले.
आणखी वाचा
First published on: 24-09-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satish alekar in indian expresss venture idea exchange