‘पिढीजात’ या नाटकानंतर नऊ वर्षांनी ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांचे नवे नाटक रंगमंचावरून सादर होत आहे. दोन पिढीतील व्यक्तिरेखांच्या कथनातून उलगडणाऱ्या ‘एक दिवस मठासाठी’ या दीर्घाकाचा रविवारी (३ मार्च) पुण्यात, अक्षरनंदन शाळेच्या सभागृहामध्ये सायंकाळी सात वाजता प्रयोग होत आहे.
‘नाटक कंपनी’ संस्थेतर्फे या दीर्घाकांची निर्मिती करण्यात आली असून युवा पिढीच्या निपुण धर्माधिकारी याने त्याचे दिग्दर्शन केले आहे. गिरीश कुलकर्णी, अमेय वाघ आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दीर्घाकाला गंधार संगोराम या युवा संगीतकाराने संगीत दिले आहे. प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या स्वरातील अभंग हे या दीर्घाकाचे अनोखे वैशिष्टय़ आहे. आई नसलेला मुलगा आणि पत्नी गमावलेले वयस्क पती अशा दोन पिढय़ांनी आपल्या जीवनाविषयी केलेले भाष्य यातून हे नाटक उलडगत जाते. हा वियोग कशा पद्धतीने सहन करीत ते कसे आयुष्य जगतात ही या दीर्घाकाची मध्यवर्ती कल्पना आहे.
याविषयी सतीश आळेकर म्हणाले, ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे माझे ‘पिढीजात’ हे नाटक २००३ मध्ये रंगमंचावर आले होते. गिरीश जोशी यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचा प्रमुख या नात्याने कामामध्ये गुंतल्यामुळे फारसे लेखन झाले नव्हते. मात्र, २००९ मध्ये निवृत्त झाल्यानंतर लेखन करण्याचे ठरविले. ‘एक दिवस मठासाठी’ हा विषय मांडताना मला त्यासाठी दीर्घाक हाच आकृतीबंध योग्य आहे, असे वाटले. यातील अखेरचे स्वगत आधी सुचले आणि मग नंतर एकांकिका लिहून झाली.’
हा दीर्घाक दोन वर्षांपूर्वी लिहून झाला. ‘दीपावली’ अंकामध्ये तो प्रसिद्ध झाला होता. अनिकेत झावरे आणि ऊर्मिला भिर्डीकर यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद केला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या (एनएसडी) ‘थिएटर इंडिया’ या अंकामध्ये हा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. एनएसडीतील प्रा. सुरेश भारद्वाज यांनी त्यांच्या विद्यार्थी कलाकारांना सोबत घेऊन या नाटकाचे हिंदूी प्रयोग केले आहेत. आता नाटक कंपनी हा दीर्घाक मराठीमध्ये करीत आहे.

आळेकरांचे नाटक हे तर, भाग्यच
 प्रायोगिक नाटकाची चळवळ नाटककार सतीश आळेकर या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ‘बेगम बर्वे’, ‘महानिर्वाण’ या नाटकांच्या वाचनातून आणि प्रयोगांतून सतीश आळेकर मला भेटले. मी त्यांच्या लेखनाचा चाहता झालो. त्यांचे एखादे नाटक करावे असे मनात होते. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपण एका नाटकाच्या संहितेचे वाचन कराल का, अशी आमची विनंती मान्य करून त्यांनी या नाटकाचे वाचन केले. या नाटकामध्ये ‘आळेकरी टच’ असला तरी नावीन्य होते. ‘हे नाटक तू करावेस’, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित करताच मला नाही म्हणणे शक्यच झाले नाही. आता तर, आळेकरांचे नाटक दिग्दर्शित करायला मिळाले हे माझे भाग्यच आहे, अशी भावना निपुण धर्माधिकारी याने व्यक्त केली. या प्रायोगिक नाटकातील वेगळेपण लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याच वातावरणात प्रयोग करण्याचा वेगळा प्रयोग करीत आहोत. त्यामुळेच बंदिस्त नाटय़गृहापेक्षाही खुल्या रंगमंचाचा पर्याय आम्ही निवडला असल्याचे त्याने सांगितले.