पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खुनाचा कट पत्नी मोहिनी वाघ हिनेच घरात रचल्याचे समोर आले असून, ही घटना पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी आहे. मोहिनी वाघ हिने सुपारी ठरलेल्या रकमेपैकी किती रक्कम अक्षय जावळकर याला दिली? ती कशाप्रकारे दिली आहे? सतीश वाघ यांना मारण्याचा नक्की उद्देश काय होता? कारण आर्थिक आहे की अनैतिक?, याचा तपास करायचा आहे, असे सांगून सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी मोहिनी वाघ हिला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली, त्यानुसार वानवडी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी योगेंद्र कवडे यांनी आरोपी मोहिनी वाघ हिला सोमवारपर्यंत (३० डिसेंबर) पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा >>> Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक
अनैतिक संबंधासह पतीचा संपूर्ण आर्थिक व्यवहार आपल्याच ताब्यात असावा, या उद्देशाने पाच लाखांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेतील सूत्रधार बायकोच असून, तिने प्रियकराच्या मदतीने मारेकऱ्यांना पाच लाख रुपये देऊन पतीचा खून घडवून आणल्याचे समोर आल्याचे तपासात पुढे आल्यानंतर पोलिसांनी मोहिनी वाघ हिला बुधवारी अटक केली आणि तिला गुरुवारी वानवडी न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, यापूर्वी अटक केलेले पवन शामसुंदर शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास उर्फ विक्की सीताराम शिंदे आणि अक्षय उर्फ सोन्या हरीश जावळकर या चार आरोपींची पोलीस कोठडी कायम ठेवून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. पोलिसांनी चारही आरोपींचा प्रॉडक्शन वॉरंट घेऊन त्यांना कारागृहातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. मोहिनी वाघ आणि आरोपी अक्षय जावळकर यांनी हा गुन्हा नक्की कोणत्या कारणाकरिता केला आहे? या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे? याबाबत आरोपींकडे समारोसमोर प्रत्यक्ष तपास करायचा आहे, असे सरकारी वकील कस्तुरे यांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार मोहिनी वाघ हिच्यासह पाचही आरोपींना न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.