पुणे : हडपसर भागातील हाॅटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे. खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली. वाघ यांचा खून करण्यासाठी सुपारी देणारी पत्नी मोहिनी हिच्यासह अन्य आरोपींच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयात केली. न्यायालयाने मोहिनी हिच्यासह अन्य आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिला.
सतीश वाघ यांचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना १० डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी वाघ यांची पत्नी मोहिनी (वय ४८), अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय २९, दोघे रा. फुरसुंगी फाटा), पवन श्यामसुंदर शर्मा (वय ३०, रा. आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. वाघोली, मूळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय २८, रा. वाघोली, मूळ रा. अहिल्यानगर), अतिश संतोष जाधव (वय २०, रा. लोणीकंद, मूळ रा. धाराशिव) यांना अटक केली. वाघ यांचा खून करण्यासाठी माेहिनी हिने आरोपींना पाच लाखांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील (स्टेटमेंट) तपासायचा आहे. खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, या दृष्टीने तपास करायचा आहे. तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवावा. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी युक्तिवादात केली.
आरोपी जाधव आणि गुरसाळे यांनी वाघ यांचा खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र पेरणे फाटा येथील भीमा नदीपात्रात टाकून दिला आहे. पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने शस्त्राचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना शस्त्र सापडले नाही, असे सरकारी वकील वाघमारे यांनी सांगितले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रचेता राठोड यांनी आरोपींची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा : जीवधन किल्ल्यावर महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
२२ साक्षीदारांकडे तपास
या खून प्रकरणात २२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे, तसेच तपासाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशीही करण्यात येणार आहे. आरोपींनी खून करण्यासाठी वापरलेले दांडके, चाकू जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी अपहरण करण्यासाठी वापरलेली मोटार, दुचाकी जप्त केली आहे. वाघ यांचा खून करण्यासाठी दिलेली दीड लाखांची रोकड, आरोपींचे कपडे जप्त करण्यात आले आहेत. आरोपींच्या मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी न्याायलयात दिली.