समोर लावण्यात आलेल्या पडद्यावर दिसणाऱ्या सरूबाईंच्या कथनातून उलगडलेले कचरा वेचून शहर ‘स्वच्छ’ करणाऱ्या कामगारांच्या कामाचे महत्त्व.. ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात आमिर खान याच्यासमोर धीटपणाने बोलणाऱ्या सरुबाई वाघमारे आणि लक्ष्मी नारायण यांची कचरावेचक कामगारांमध्ये असलेली उपस्थिती.. या कामाचा प्रसार रूपेरी पडद्यावरून होत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमललेले समाधान.. अशा प्रसन्नदायी वातावरणात एक हजारांहून अधिक कामगारांनी आपल्या कामाचे महत्त्व देशभर अधोरेखित होताना धवल यशाची अनुभूती घेतली.
कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायतीचा उपक्रम असलेल्या स्वच्छ संस्थेच्या पाच वर्षांच्या प्रवासाचा आढावा रविवारी एका स्नेहमेळाव्यात घेतला गेला. ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात आमिर खान याच्यासमवेत सरूबाई वाघमारे आणि लक्ष्मी नारायण यांनी स्वच्छ संस्थेच्या कामाची माहिती दिली. जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे झालेल्या मेळाव्यामध्ये या कार्यक्रमाचे प्रसारण सर्व कचरावेचक कर्मचाऱ्यांनी पडद्यावर पाहिले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, पंचायतीच्या लक्ष्मी नारायण, सरूबाई वाघमारे आणि अॅड. मोहन ननावरे यांच्यासह कचरावेचक महिला आणि त्यांची मुले असे एक हजाराहून अधिकजण या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. काही कचरावेचकांच्या मुलांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
कचरा गोळा करण्याचे कष्टाचे काम आम्ही प्रामाणिकपणे आणि कष्टाने करतो. कोणी तरी आमच्या कामाची दखल घेतली आणि या कामाला पाठिंबा दिला याचा आनंद आहे, अशी भावना सरूबाई यांनी व्यक्त केली. या कामगारांच्या कामाचा मान राखला जावा आणि कामाचा रास्त मोबदला मिळावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आमिर खान याच्याशी त्यांनी मराठीतून संवाद साधला. ऊन-पावसाची तमा न बाळगता कचरा गोळा करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी राबणाऱ्या या हातांचा आमिर खान याने गौरव केला.
‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाचा हा भाग कचरा या समस्येचा वेध घेणारा असून यामध्ये स्वच्छ संस्थेने पुण्यामध्ये केलेल्या कामाला समर्पित केला असल्याचे सांगून डॉ. बाबा आढाव म्हणाले, स्वच्छतेच्या दूतांचे पुणे हे घर आहे. या संस्थेला पाठिंबा देण्याबरोबरच संस्थेच्या कामाची व्याप्ती वाढविण्याऐवजी महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. मात्र, मागील अनुभवांपासून महापालिकेने धडा घेतला आहे असे दिसत नाही. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा