‘स्वत:च्या जाती-पातीची भिंत तोडून चांगले कार्य करणे कला शिकवते. या कलेमुळेच मी चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करु शकलो. या कलेमुळेच मला सत्यशोधक पुरस्कार मिळू शकला,’ या शब्दात प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे महानगर पालिका कामगार यूनियनतर्फे यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला ‘सत्यशोधक पुरस्कार’ अतुल पेठे यांना डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हरी नरके व कुणाल कुमार उपस्थित होते. पेठे यांनी सफाई सेवकांना सोबत घेऊन ‘सत्यशोधक’ हे नाटक रंगभूमीवर आणले म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
सफाई कामगारांना आजसुद्धा त्रास सहन करावा लागतो. शिक्षण असूनसुद्धा एका विशिष्ट जातीचे असल्यामुळे त्यांना सफाईचे काम करावे लागत आहे, अशा शब्दांत पेठे यांनी आजच्या वास्तवावर प्रकाश टाकला.
डॉ. रावसाहेब कसबे यांनी आपल्या भाषणात अतुल पेठे यांच्या सत्यशोधक नाटकाची प्रशंसा केली. हे नाटक सर्व भाषांमध्ये प्रसिद्ध व्हायला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली. नरके यांनी सांगितले, की ‘कचराकोंडी’ आणि ‘सत्यशोधक’ मुळे समाजात एक नवी वाट खुली झाली आहे. या विषयांच्या धरतीवर ‘कोर्ट’ आणि ‘ख्वाडा’ सारख्या चित्रपटांचा निर्माण होत आहे.
पेठे यांनी पुरस्काराची मिळालेली ५१ हजार रुपयांची रक्कम केरळच्या ‘जन-मन दाता’ या संस्थेला देणार असल्याची घोषणा केली. ‘सत्यशोधक’ हे नाटक मल्ल्याळी भाषेत करण्यास त्याचा उपयोग केला जाणार आहे. या वेळी यूनियनचे अध्यक्ष उदय भट, मुक्ता मनोहर, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

Story img Loader