पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घेण्याचा अर्ज विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी सोमवारी मंजूर केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लंडनमध्ये अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी ‘हा खटला ऐतिहासिक प्रसंग आणि घटनांवर अवलंबून आहे. या खटल्यात बचाव पक्षाला उलटतपासणी घ्यावी लागणार आहे. नैसर्गिक न्यायतत्त्वाला धरून, तसेच कायद्यातीत तरतुदींनुसार बचाव पक्षाला खटल्याची सुनावणी, उलटतपासणी विस्तृत स्वरूपात घ्यावी लागणार आहे. मात्र, या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ म्हणून घेतल्यास बचाव पक्षाला विस्तृत आणि सखोलपणे साक्षीदारांची उलटतपासणी घेता येणार नाही,’ असे ॲड. पवार यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
‘वेळोवेळी आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची परवानगी लागेल. फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रे, राहुल गांधी यांनी लंडनमधील कार्यक्रमात केलेेल्या भाषणाची ‘सीडी’, वर्तमानपत्रे, पुस्तके, साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र आतापर्यंत बचाव पक्षाकडे हस्तांतरित करण्यात आली नाहीत. सुनावणी सुरू होण्यापूर्वी ही कागदपत्रे बचाव पक्षाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत,’ असे ॲड. पवार यांनी सांगितले. त्यानुसार न्यायालयाने सात्यकी सावरकर यांचे लेखी म्हणणे मागितले आहे. खटल्याची पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे.