पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय न देणारा आणि काही मोजक्या व्यक्तींच्या हितासाठीच तयार करण्यात आलेला विकास आराखडा विसर्जित करून पुणे बचाव समितीतर्फे आराखडय़ाच्या विरोधातील आंदोलनाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली.
पुणे शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा गैरप्रकारांमुळे वादग्रस्त ठरला असून या आराखडय़ातील आरक्षणांबाबतही आरोप केले जात आहेत. आराखडय़ातील एफएसआय संबंधीची एक गंभीर चूक लक्षात आणून दिल्यानंतर ती मुद्रणदोषामुळे झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. काही मोजक्या व्यक्तींच्या हितासाठीच आराखडा करण्यात आल्यामुळे अनेक अव्यवहार्य आरक्षणे तसेच नवे रस्ते, रस्ता रुंदी वगैरे या आराखडय़ात प्रस्तावित करण्यात आल्याचे पुणे बचाव समितीचे म्हणणे आहे. या आराखडय़ातून सर्वसामान्यांना आणि मध्यमवर्गीयांना काहीही मिळालेले नाही. या सर्व प्रकारांना वाचा फोडून नागरिकांकडून हरकती-सूचना गोळा करण्याचे काम समितीने शुक्रवारपासून सुरू केले. तत्पूर्वी आराखडय़ाचे मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले.
मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याला काँग्रेसचे रोहित टिळक आणि भाजपचे योगेश गोगावले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीची सांगता महापालिका भवनाजवळील टिळक पुलाजवळ करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेश सचिव, नगरसेवक संजय बालगुडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवा मंत्री, पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर, समन्वयक विनय हर्डीकर यांची या वेळी भाषणे झाली. विकास आराखडय़ातील अनेक तरतुदी अव्यवहार्य असून अनेक तरतुदी हितसंबंधीयांच्या लाभासाठी करण्यात आल्यामुळे त्यातून सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होणार आहे. या प्रकारांच्या विरोधात आवाज उठवला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Save pune movement started after immersion of development plan
Show comments