पुणे : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली जाते. या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवासभत्ता, निर्वाह भत्ता म्हणून निधी दिला जातो.

महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या, पण वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी ही योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवासभत्ता, निर्वाह भत्त्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी ६० हजार रुपये, इतर महसुली विभागीय शहरातील आणि उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये ५१ हजार, इतर जिल्ह्याच्या ठिकाणी ४३ हजार आणि तालुक्याच्या ठिकाणी शिकत असलेल्यांना ३८ हजार रुपये दिले जातात.

हेही वाचा…आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाताय? भाविकांसाठी रेल्वेने केली विशेष सोय…

पालकांचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या आणि योजनेच्या अटी, शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करता येईल. त्यासाठीचे अर्ज महाविद्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी येरवडा येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन सहायक संचालक संगीता डावखर यांनी केले.

Story img Loader