पुणे : देशातील शालेय शिक्षणातील सुमारे २५ कोटी विद्यार्थ्यांपैकी जेमतेम ४.३ कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत येतात. देशभरात जवळपास एक हजार विद्यापीठे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील ५० टक्के प्रवेश गुणोत्तराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आव्हान आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणात आणल्यास सध्या आहेत तितकीच आणखी विद्यापीठे निर्माण व्हावी लागतील, असे मत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. टी. जी. सीताराम यांनी मांडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२४व्या पदवी प्रदान सोहळ्यात डॉ. सीताराम बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात ७ हजार १२५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

हेही वाचा : राज्यातील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची १० ते १२ जुलै दरम्यान परीक्षा

विकसित राष्ट्र होण्यासाठी संशोधन-विकासावर भर देण्याची गरज व्यक्त करून डॉ. सीताराम म्हणाले, की सध्या देशात संशोधनासाठी सुवर्णकाळ आहे. संशोधनासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. एआयसीटीईने नुकतीच सेंटर फॉर सेल्युलर ॲण्ड मोलेक्युलर प्लॅटफॉर्म्ससह ‘एआयसीटीई-इंटर इन्स्टिट्यूशनल बायोमेडिकल इनोव्हेशन्स प्रोग्रॅम’ (आयबीआयपी) हा प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संस्थांमध्ये एकत्रितरित्या आंतरविद्याशाखीय शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पना शक्य होणार आहे. मनुष्यबळ आणि कौशल्याच्या गरजा झपाट्याने बदलत आहेत. त्यामुळे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या ज्ञानवृद्धीसह त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण योगदानही देता येईल.

हेही वाचा : राज्यातील धरणांचा पाणीसाठा अद्यापही तळाला; पुणे, औरंगाबादमध्ये कमी साठा

तंत्रशिक्षणातील भाषांचे बंधन दूर करण्यासाठी एआयसीटीईने अनुवादिनी हे अनुवादाचे साधन विकसित केले आहे. या साधनाद्वारे इंग्रजीतील तांत्रिक कागदपत्रे, शैक्षणिक आशय विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत उपलब्ध करून देता येणार आहे. त्यामुळे कठीण संकल्पना विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत समजून घेता येऊ शकतात, त्यांची शैक्षणिक कामगिरी उंचावू शकते. त्यामुळे अनुवादिनी हे साधन सर्वसमावेशक ठरते, असेही डॉ. सीताराम यांनी सांगितले..