पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्ष संपूनही वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन कागदावरच राहिले आहे. या वर्षात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने वर्षभरातील कार्यक्रमांची रुपरेषा जाहीरच केली नाही. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून गौरवल्या गेलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्ष गेल्यावर्षी सुरू झाले. १० फेब्रुवारी रोजी विद्यापीठाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अमृतमहोत्सवाच्या औचित्याने वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आली होती. त्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. तसेच वर्षभरात मराठी भाषा भवनाचे काम पूर्ण करणे, संशोधन विकास विभाग स्थापन करणे अशा काही घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र वर्षभरात कोणते कार्यक्रम आयोजित केले जाणार याची रुपरेषा समितीकडून वर्ष संपत येऊनही जाहीर करण्यात आली नाही.
हेही वाचा : “एवढं करुन जर मस्ती असेल तर ती पोलिसी खाक्या…”, पुण्यातील गुंडांना अजित पवारांचा थेट इशारा
अमृतमहोत्सवी वर्षातील पहिले सहा महिने विद्यापीठात प्रभारी कारभार सुरू होता. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यात उल्लेखनीय असे काही घडले नाही. त्यानंतर विद्यापीठाकडून बोधचिन्ह स्पर्धा, नामांकित माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, अमृतमहोत्सवी उद्यानाची निर्मिती, काही परिषदांचे आयोजन, कविसंमेलन असे काही कार्यक्रम करण्यात आले. मात्र अमृतमहोत्सवी वर्षाच्या औचित्याने नियुक्त केलेल्या समितीने वर्षभरातील कार्यक्रमांचे केलेले नियोजन गुलदस्त्यातच राहिले आहे. “अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोठे संशोधन प्रकल्प, विद्यार्थी वसतिगृहासह हरित संकुलाची निर्मिती, नामवंत माजी विद्यार्थी सत्कार, अहमदनगर, नाशिक येथे विशेष व्याख्यानमाला असे विविध कार्यक्रम पुढील वर्षभरात होणार आहेत. त्याबाबतची सविस्तर रुपरेषा लवकरच जाहीर केली जाईल”, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : “माझ्याकडे आजही त्याचा राजीनामा”, अजित पवारांनी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना झापलं
जयकर ज्ञानस्रोत केंद्रात दुर्मीळ ग्रंथाचे प्रदर्शन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृतमहोत्सवी वर्षासह विद्यापीठातील जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दुर्मीळ ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. माजी सहायक ग्रंथपाल डॉ. लता गोंडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाचा पहिला पदवी प्रदान सोहळा, पहिला वर्धापन दिन, ‘विद्यापीठ वार्ता’चा पहिला अंक, विद्यापीठाचा पहिला वार्षिक अहवाल, पुणे विद्यापीठ कायदा १९४८, विद्यापीठाला भेट दिलेल्या अनेक मान्यवरांची छायाचित्रे, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, ना. धों. महानोर अशा साहित्यिकांच्या हस्ताक्षरातील पत्रे, विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचा वैयक्तिक पुस्तकांचा संग्रह, त्यांना ६ व्या जॉर्जने प्रदान केलेले पदक, केंद्राच्या पहिल्या पाच ग्रंथपालांचे छायाचित्र यांचा प्रदर्शनात समावेश आहे. हे प्रदर्शन १५ फेब्रुवारीपर्यंत खुले राहणार आहे, अशी माहिती जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र यांनी केले आहे.