सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभाग बौद्ध पारिभाषिक शब्दकोशाचा प्रकल्प सुरू आहे. आतापर्यंत या कोशामध्ये पाली, संस्कृत, तिबेटन, इंग्रजी या भाषांचा समावेश होता. मात्र आता कोशाच्या पाचव्या भागापासून चिनी भाषेचा देखील समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. महेश देवकर यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या तीन वर्षांत अनेक नामांकित संस्थांबरोबर दीडशे सामंजस्य करार केले. त्यातील पाच करार हे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागासोबत झाले आहेत.
हेही वाचा >>> राज्यपालांचं करायचं काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने केला पिंपरी चिंचवडमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट
या बाबत पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख डॉ. महेश देवकर म्हणाले की, २०१५ पासून विभागाने खेन्त्से फाऊंडेशन इंडिया यांच्यासोबत कराराद्वारे विभागाला दरवर्षी १९ लाख ७० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळते. पाली आणि बौद्ध साहित्याच्या हस्तलिखितांचे संपादन आणि भाषांतराचे काम करण्यात येत आहे. बौद्ध पारिभाषिक शब्दकोशाच्या प्रकल्पात माझ्यासह विभागातील डॉ. लता देवकर आणि दोन विद्यार्थी काम करत आहेत. या प्रकल्पासाठी खेन्त्से फाऊंडेशनकडून आतापर्यंत ८८ हजार अमेरिकन डॉलर्स एवढे अनुदान प्राप्त झाले आहे.
हेही वाचा >>> पुणे: आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती प्रक्रियेबाबत आक्षेप
शब्दकोशाचे असे एकूण ५० भाग प्रकाशित केले जाणार आहेत. पुढील पंधरा वर्षे हा प्रकल्प सुरू राहणार आहे. खेन्त्से फाऊंडेशन इंडियाबरोबर ‘भाषा अध्ययन कार्यक्रम’ या अंतर्गत दुसऱ्या कराराद्वारे नऊ विनाअनुदानित भाषाविषयक अभ्यासक्रमांना शिक्षकवृत्ती, विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या रुपाने दहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळेल. तसेच या योजने अंतर्गत दोन एकत्रित पदवी अभ्यासक्रम, तर काही पदविका अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यासोबत केलेल्या कराराद्वारे पाली त्रिपिटक (बौद्ध साहित्य ग्रंथ) मराठी भाषांतराचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. २५ हजार पानांच्या भाषांतराचे पुढील पाच वर्षे हे काम सुरू राहणार आहे. त्यासाठी ४ कोटी ९५ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, असे डॉ. देवकर यांनी सांगितले.