पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तारांकित कन्व्हेन्शन सेंटर, अतिथिगृह बांधण्याचा घाट घालण्यात येत आहे. ज्येष्ठ उद्योगपती सायरस पूनावाला यांच्याकडून त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावाला अद्याप मूर्त स्वरूप आलेले नाही. मात्र, या प्रकल्पाबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतच मतमतांतरे आहेत.
ज्येष्ठ उद्योगपती सायरस पूनावाला यांनी विद्यापीठाला दोनशे कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. या माध्यमातून विद्यापीठातील सुमारे कन्व्हेन्शन सेंटर, अतिथिगृह बांधण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाबाबत बराच काळ चर्चा, सल्लामलसत सुरू आहे. विद्यापीठाची जागा शासकीय मालकीची असल्याने विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली, तरी राज्यपाल, राज्य शासनाकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रकल्पाबाबत नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत बरीच चर्चाही झाली.
हेही वाचा…पुणे : काडीपेटीवरून मद्यालयात राडा
व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर म्हणाले, की कन्व्हेन्शन सेंटर दीर्घकालीन विचार करता विद्यापीठासाठी उपयुक्त ठरणार आहे. या निमित्ताने विद्यापीठ उद्योग क्षेत्राशी जोडले जाणार आहे. त्याचा सर्वांगीण फायदा विद्यापीठाला होऊ शकेल. तांत्रिक अडचणी उद्भवू नयेत याबाबतची काळजी घेतली जात आहे.
मूळ प्रस्ताव वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि वसतिगृहांसाठीच्या निधीचा होती. मात्र, त्यात बदल होऊन आता त्याचे रूपांतर तारांकित कन्व्हेन्शन सेंटर, अतिथिगृहात झाले आहे. त्यासाठी दहा हजार झाडे तोडावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठात विद्यार्थ्यांना वसतिगृह न मिळण्यासारख्या मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे, असे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी सांगितले. त्याशिवाय आणखी एका सदस्याने विरोध करणारे पत्र कुलगुरूंना दिले आहे.
हेही वाचा…शहरबात… पिंपरी : खड्डेमय उद्योगनगरीची ‘रस्तामुक्त’ फरफट! ‘खड्डेच खड्डे चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे’
दरम्यान, प्रकल्पाबाबतची चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. अद्याप काहीच अंतिम झाले नसल्याने त्यावर अधिक चर्चा करणे योग्य नाही, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.