सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात शुक्रवारी पुणेरी पगडी की फुले पगडी यावरुन सुरु असलेला वाद उफाळून आला. पदवीदान सोहळ्यादरम्यान पुणेरी पगडीला विरोध दर्शवत चार विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या चारही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळ्यात काळा घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ची जागा नवीन पोशाखाने घेतली. विद्यापीठ प्रशासनाने पदवीप्रदान कार्यक्रमासाठी वर्षांनुवर्षे असलेला हा पोशाख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार ११ जानेवारीला (शुक्रवारी)  होणाऱ्या पदवीप्रदान कार्यक्रमासाठी कुडता, पायजमा आणि उपरणे असा भारतीय पोशाख असेल, असे स्पष्ट करण्यात आले. गणवेशात पुणेरी पगडीचा समावेश करावा की फुले पगडीचा यावरुन वाद निर्माण झाला होता.

शुक्रवारी पदवीदान समारंभ सुरु असताना चार विद्यार्थ्यांनी पुणेरी पगडीचा मुद्दा उपस्थित करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणेरी पगडी नको, फुले पगडी द्या, अशी मागणी हे विद्यार्थी करत होते.

निर्णय का घेण्यात आला?

भारतातून ७० वर्षांपूर्वी ब्रिटिश गेले. मात्र त्यानंतरही पदवीप्रदानाला घोळदार गाऊन आणि टोपी घालण्याची ब्रिटिशांची परंपरा पुढेही सुरूच राहिली. आजही बहुतांश विद्यापीठांमध्ये घोळदार गाऊन आणि टोपी हाच पोशाख असतो. काही महिन्यांपूर्वी भारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह यांनी ही ब्रिटिशकालीन पद्धत बंद करण्याची गरज व्यक्त केली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही त्याबाबत विचाराधीन होते. अखेरीस विद्यापीठाने पदवीप्रदान कार्यक्रमासाठी पोशाख बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कुडता, पायजमा आणि उपरणे असा पोशाख ठरवण्यात आला आहे. सोबत पगडीही असेल, असे सांगण्यात आले.

या पूर्वीही बदल..

विद्यापीठाने या पूर्वीही पदवीप्रदान पोशाखात बदल केला होता. डॉ. राम ताकवले कुलगुरू असताना १९८१-८२ च्या सुमारास हा बदल करण्यात आला होता. ‘साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे पदवीप्रदान व्हावे, असे सुचवले होते. हा बदल करण्यासाठी संस्कृत तज्ज्ञ डॉ. रा. ना. दांडेकर यांची समिती नेमली होती. त्यानुसार उपरणे हे पांडित्य आणि शौर्याचे प्रतीक आहे असे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोशाखात उपरणे समाविष्ट करण्यात आले, तर उपदेश संस्कृतमध्ये देण्यात येऊ लागला. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले विद्यापीठ गीत संगीतकार डॉ. भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केले होते. काही काळानंतर गाऊन पुन्हा वापरण्यास सुरुवात झाली,’ अशी आठवण डॉ. ताकवले यांनी सांगितली.

विद्यार्थ्यांचे म्हणणे काय ?
काही विद्यार्थी संघटनांचा पुणेरी पगडीला विरोध आहे. ‘पुणेरी पगडी हे पेशवाईचं प्रतीक असून फुले पगडी हे शिक्षणाचं प्रतीक आहे. तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फुलेंनी अथक मेहनत घेतली. तर पुणेरी पगडीचा शिक्षणाशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे पुणेरी पगडीच्या जागी फुले पगडीचा समावेश करण्यात यावा, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savitribai phule pune university convocation ceremony puneri pagdi row 4 students detained