सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात नवीन पोशाखाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले होते. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळ्यात काळा घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ची जागा नवीन पोशाखाने घेतली. शुक्रवारी विद्यापीठात पदवीदान समारंभ पार पडला. या प्रसंगी कुडता, पायजमा,उपरणे आणि पगडी असा पोशाख होता. या समारंभाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले. पुणेरी पगडी नको फुले पगडी हवी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले आणि त्यांना ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा आकाश झांबरे आणि अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, हा समारंभ सुरु असताना नवीन पोशाख आणि पगडीवरून अन्य विद्यार्थी संघटनांनीही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर यावर अन्य विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केतकी घाडगे म्हणाली की, पगडीवरून वाद घालण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षण चांगले शिक्षण मिळेल याकडे सर्वानी लक्ष दिले पाहिजे. तर मला कोणत्याही पोशाखा मध्ये आलो असतो तरी आनंदच झाला असता. आज पारंपारिक पोषाखात आल्याने अधिकचा आनंद झाला असून संघटना आणि विद्यापीठ यापुर्वी सर्व बाबीवर चर्चा होण्याची आवश्यकता होती. असे निलेश भापकरने सांगितले. राज्यातील अनेक भागातील विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहत असून त्याकडे समाजातील प्रत्येक घटकाने लक्ष देण्याची गरज आहे. तर अशा वादात कोणी पडू नये आणि वेळ वाया घालवू नका, अशी भूमिका पूर्वा कुंभारने मांडली.