पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या प्रथम ते अंतिम वर्षाच्या उन्हाळी सत्राची परीक्षा पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने १० एप्रिलपासून सुरू होणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यापीठाने उत्तरपत्रिकांतील पाने वाढवण्याचा निर्णय घेऊन पुरवणी सुविधा बंद केली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परीक्षेबाबतची माहिती आणि मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केल्या. पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या नियमित आणि अनुशेषित विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान, विधी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा १० ते २५ एप्रिल या कालावधीत महाविद्यालय स्तरावर घेतल्या जातील. त्यासाठीचे वेळापत्रक, प्रश्नपत्रिका, परीक्षा आयोजन, उत्तरपत्रिका तपासणी, विद्यापीठाच्या प्रणालीत अंतर्गत गुण भरणे आदी प्रक्रियेचे नियोजनही महाविद्यालय स्तरावर करायचे आहे. पारंपरिक अभ्यासक्रमातील पदवी स्तरावरील (कला, वाणिज्य, विज्ञान, विधी) अभ्यासक्रम वगळून, पदव्युत्तर स्तरावरील सर्व वर्षांच्या, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सर्व वर्षांच्या परीक्षांचे आयोजन विद्यापीठ स्तरावर करण्यात येणार आहे. पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या (कला, वाणिज्य, विज्ञान, विधी) परीक्षांवेळी महाविद्यालयाने स्वत:च्या उत्तरपत्रिका वापराव्यात, विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका वापरू नये, तसेच परीक्षेच्या गोपनीयतेची आणि सुरक्षिततेची काळझी घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. 

हेही वाचा >>>आमदार बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी…

पुरवणी पद्धत बंद करण्याच्या निर्णयाबाबत डॉ. काकडे म्हणाले, की परीक्षांतील गैरप्रकार रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने समिती नियुक्त केली होती. त्या समितीच्या अहवालातील शिफारसींमध्ये पुरवणी पद्धत बंद करण्याचीही शिफारस होती. त्या अनुषंगाने विद्यापीठाने नेमलेल्या समितीने पुरवणी पद्धत बंद करण्याची शिफारस केली. त्यानुसार परीक्षा विभागाच्या बैठकीत ती शिफारस स्वीकारण्यात आली. त्यामुळे येत्या परीक्षेपासून परीक्षेत पुरवणी उपलब्ध होणार नाही. पुरवणी पद्धत बंद करतानाच उत्तरपत्रिकांतील पाने वाढवून २४ आणि  ३६ करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, त्यांना लेखनासाठी पुरेशी पाने उपलब्ध होतील.

गैरप्रकारांना चाप, खर्चावर नियंत्रण

पुरवणी पद्धतीमध्ये विद्यापीठाला पुरवणी उत्तरपत्रिका छापण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, खर्च करावा लागत होता. मात्र आता पुरवणी बंद केल्याने विद्यापीठाला हा खर्च करावा लागणार नाही. त्याशिवाय पुरवणीचा वापर करून महाविद्यालय स्तरावर गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र आता या प्रकारांना चाप लागणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savitribai phule pune university decision to increase answer sheet pages for all faculties examination pune print news ccp 14 amy