‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी ओळख लाभलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं देशातील सवरेत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत नववे स्थान मिळविलं आहे. या मानांकनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स योजनेतील संस्थांमध्ये समाविष्ट होण्याच्या दिशेनं विद्यापीठाने एक पाऊल टाकलं आहे. या निमित्ताने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी साधलेला संवाद.
राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या १० विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश झाला आहे, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय ?
– राष्ट्रीय स्तरावरील हे मानांकन म्हणजे विद्यापीठाच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आणि विद्यापीठाच्या प्रगतीसाठी मनापासून केलेल्या प्रयत्नांची पावती आहे, असे मला वाटतं. या मानांकनामुळे भविष्यात अनेक नव्या संधी विद्यापीठाला मिळतील हे या मानांकनाचं सर्वात मोठं वैशिष्टय़ आहे.
गेल्या वर्षी दहावा क्रमांक, या वर्षी नववा क्रमांक पुढच्या वर्षीसाठी विद्यापीठाने कोणतं लक्ष्य नजरेसमोर ठेवलं आहे?
– आपल्या पुढे असलेली इतर विद्यापीठं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळालेले गुण यामध्ये अवघ्या काही गुणांचा फरक आहे. विद्यापीठ पहिल्या दहामध्ये असणं ही गोष्ट मोठी आहेच, पण ते पहिल्या दोन किंवा पाचमध्ये यावं या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्व शिक्षक, विभाग प्रमुख चांगलं काम करत आहेत, कॅम्पसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, त्यामुळे हे लक्ष्य गाठणं फार अवघड आहे असं वाटत नाही.
जास्तीत जास्त विद्यार्थिकेंद्रित होण्यासाठी विद्यापीठ काय करणार आहे?
– कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून प्रत्येक गोष्ट विद्यार्थिकेंद्रित असावी हाच माझा दृष्टिकोन आहे. समज आणि आकलन या गोष्टीच्या अभावामुळे विद्यापीठातल्या अनेक चांगल्या गोष्टी बाहेर कुणाला माहीत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत.
लोकांना विद्यापीठाबद्दल काय वाटतं यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांची इथून पुढे होणारी वाटचाल जास्त महत्त्वाची आहे. यंत्रणेमध्ये काही प्रमाणात असलेलं सुस्तावलेपण कमी करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
राष्ट्रीय मानांकनाचं नेमकं महत्त्व काय?
– राष्ट्रीय मानांकनामुळे देशपातळीवर आपण कुठे आहोत हे समजणं ही गोष्ट महत्त्वाची आहेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स या योजनेमध्ये विद्यापीठाचा समावेश होण्यासाठी हे मानांकन महत्त्वाचं ठरणार आहे. त्यातून मिळणारं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता यांचा विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यासाठी उपयोग करता येणं शक्य आहे. शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळणं हा असायला हवा, त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या काही र्निबधांशिवाय अभ्यासक्रम आणि प्रशासनामध्ये बदल करण्याचं स्वातंत्र्य मिळू शकेल.
पुस्तकी शिक्षण आणि प्रत्यक्षातील अनुभव यातली दरी कशी भरून काढणार?
– अभ्यासक्रम स्किलबेस्ड हवा असं सतत बोललं जातं, पण म्हणजे नेमकं काय याचं उत्तर आपल्याकडे नाही. यावर उपाय म्हणून विद्यार्थी शिकून ज्या क्षेत्रात कामासाठी जाणार आहेत, त्या क्षेत्राची गरज काय याचा विचार कोणी करत नाही. म्हणून विद्यापीठाचे दरवाजे उद्योग, स्वयंसेवी संस्था, आयटी कंपन्या यांच्यासाठी खुले करण्याची गरज आहे.
त्यासाठी २५ वर्षांपूर्वीच्या नोट्स बाद करून अभ्यासक्रम आजच्या काळाशी सुसंगत करण्याची गरज आहे. तुम्ही जे शिकवता ते नको आहे, असं म्हणणाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना काय हवं हे समजून घेऊन ते विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत.
या वाटचालीत विद्यार्थ्यांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत?
– अनेक विद्यार्थी खेडय़ापाडय़ांतून इथं शिकायला येतात, त्यांनी आपण कशासाठी शहरात आलो, हे विसरू नये ही माझी एकमेव अपेक्षा आहे. त्यांना हव्या असलेल्या सोयीसुविधा देण्यापासून त्यांच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्या बरोबर उभे राहण्यासाठी विद्यापीठ आहे, मात्र त्यांनी आपले ध्येय विसरू नये.