लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता १३ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
विद्यापीठाचे विविध शैक्षणिक विभाग, संशोधन केंद्रे आणि प्रशालांमध्ये विविध पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. यापूर्वी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा मे-जूनमध्ये होत असत. मात्र, विद्यार्थी-पालकांची मागणी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी विचारात घेऊन यंदा प्रवेश परीक्षा लवकर घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी १२ फेब्रुवारीपासून ऑनलाइन प्रवेशअर्ज खुले करून ३ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता त्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा ४ एप्रिल, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा १८ ते २० मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेबाबतची अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रतेचे निकष आणि प्रवेशप्रक्रियेबाबत अधिक माहिती https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx या दुव्यावर उपलब्ध असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.